भयंकर! पैशांसाठी मित्राची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले

5676
murder-knife

पैशांसाठी आपल्याच मित्राची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये आग्रा येथे घडली आहे. धर्मेंद्र तिवारी असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र 18 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना धर्मेंद्रला ललित नावाच्या तरुणासह शेवटचं पाहिल्याची माहिती मिळाली. बेपत्ता होण्यापूर्वी ललित आणि धर्मेंद्रचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यावरूनच ललितची ओळख पटली होती. ललितचा शोध घेताना पोलिसांना ललित आणि धर्मेंद्र कधी काळी रूम पार्टनरही असल्याचं समजलं. काही वर्षांपूर्वी ते एका भाड्याच्या खोलीत शेअरिंग तत्वावर राहत होते. तेव्हा पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी थेट ललितचं घर गाठलं. त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली.

या चौकशीअंती जो खुलासा ललितने केला, तो भयंकर होता. ललितचा भाऊ रोहित याच्यावर 50 लाखांचं कर्ज होतं. रोहितला ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत चुकती करायची होती. त्यामुळे ललितने हा अपहरणाचा डाव रचला होता. धर्मेंद्र हा उच्चभ्रू कुटुंबातला असावा असं वाटल्याने त्याचं अपहरण करण्याचं निश्चित करण्यात आलं. ललितने धर्मेंद्रला बहाण्याने घरी बोलवलं आणि त्याला कॉफीतून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर त्याने धर्मेंद्रचे हातपाय आणि तोंड बांधून त्याला खोलीत डांबून ठेवलं. पण, धर्मेंद्रचा गुदमरून मृत्यू झाला.

धर्मेंद्रच्या मृत्युमुळे घाबरलेल्या ललितने त्याचा मृतदेह नष्ट करायचं ठरवलं. त्याने मृतदेहाचे तुकडे केले. शरीराचा सापळा आणि मुंडक्यासह मोठे भाग नाल्यात टाकून दिले. उरलेले तुकडे त्याने प्रेशर कुकरमध्ये शिजवले. शेजाऱ्यांनीही घरातून मांस शिजल्याचा वास येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. अर्थात ललित किंवा कुटुंबाने नरमांस सेवन केलं होतं का, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण, या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या