
चिकलठाणा परिसरातील मिनी घाटीच्या पाठीमागील चौधरी कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिनकर भिकाजी बोराडे कुटुंबीयावर त्याच गल्लीतील अमोल भागीनाथ बोर्डे या तरुणाने धारदार सुऱ्याने हल्ला करुन तिघांची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अमोलला पोलिसांनी अटक करुन त्याच्या ताब्यातून सूरा जप्त करण्यात आला आहे.
चौधरी कॉलनीतील दत्तनगरात दिनकर भिकाजी बोराडे (55), कमला दिनकर बोराडे (50) व मुलगा भगवान दिनकर बोराडे (26) हे तिघजण राहत होते. बुधवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे हे बोराडे कुटुंबीय घरामध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त होते. त्याच गल्लीत राहणारा अमोल भगवान बोर्डे हा सेंट्रींगचे काम करत असून अमोल आणि बोराडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याची धुसफूस सुरुच होती. बुधवारी सायंकाळी याचाच राग धरून अमोल बोर्डे हा दिनकर बोराडे यांच्या घरामध्ये शिरला आणि त्याने दिनकर, कमलबाई आणि मुलगा भगवान या तिघांवर धारदार चाकूने हल्ला केल्याने तिघजण रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडले.
दरम्यान या तिहेरी हत्याची वार्ता परिसरात पसरतच स्थानिक नागरिकांनी चौधरी कॉलनीत धाव घेत एकच गर्दी करू लागले होते. हत्याचे माहिती पोलिसांना मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस उपनिरीक्षक ताहेर पटेल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता समोरच भगवान, नंतर दिनकर आणि शेवटी कमलाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. पोलिसांनी त्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव मोठा असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक माळाळे यांनी नियंत्रण कक्षातील स्ट्रायविंâग फोर्सला पाचरण केले. दरम्यान पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हे आपल्या पथकासह दाखल झाले. त्यांनी परिसरात जमलेला जमाव बाजूला केला त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडलेल्या बोराडे कुटुंंबीयांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले.
हल्लेखोर गजाआड
बोराडे कुटुंबीयाची निघृण हत्या करणाऱ्या अमोल भागिनाथ बोर्डेला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून सुरा जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले. अमोलने त्या तिघांवर सुऱ्याने सपासप वार केला असल्याची कबुली दिली. खून करण्याचे कारण मात्र रात्री उशिरापर्यत समजू शकले नाही. मयताची मुलगी विमल गजानन गावंडेच्या तक्रारीवरुन हल्लेखोर अमोल विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरु होती.



























































