अंगावर वीज पडूनही तो जिवंत राहिला..!! पाहा या थरारक घटनेचा व्हिडीओ

3224

जोराचा पाऊस, वादळ-वारा असेल तर घराबाहेर पडू नये, असा इशारा आपल्याला वारंवार दिला जातो. कारण, अशा वेळी वीज कोसळण्याची शक्यता असते. पावसात वीज पडून माणसं किंवा प्राणी मृत्युमुखी पडलेल्या अनेक घटना आपण सर्वांनीच ऐकलेल्या आहेत. मात्र, वीज कोसळल्यानंतरही एक माणूस जिवंत राहिला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही घटना अमेरिकेतील साऊथ कॅरोलिनाच्या एका व्यक्तिसोबत घडली आहे. रोमुलुस मॅकनील असं या व्यक्तिचं नाव आहे. ते तिथल्या एका शाळेत समुपदेशक म्हणून काम करतात. मॅकनील एक दिवस भर पावसात त्यांच्या घराच्या अंगणातून जात होते. त्याच वेळी त्यांच्यावर वीज कोसळली. त्यांना वीजेचा झटका बसला आणि त्यांच्या हातातली छत्रीही फेकली गेली. मात्र, वीजेची तीव्रता कमी असल्याने ते बालंबाल बचावले. वीज पडल्याची जाणीव होताच मॅकनील तिथून धावत सुटले आणि त्यांनी त्वरित आसरा शोधला.

ही थरारक घटना त्यांच्या घराशेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मॅकनील यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. वीज अंगावर कोसळल्यानंतरही ते बचावले आहेत, याबाबत नेटकऱ्यांनीही अचंबा व्यक्त करत त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या