
ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या व्यापारी गाळे जिल्हा परिषद प्रशासनाने सील केले होते. पण, परवानगी न घेताच ते गाळे खुले करणाऱयांवर कारवाईबाबत टाळाटाळ होत असल्याने मोहोळ तालुक्यातील काफळे येथील सचिन राजू चव्हाण याने सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.
काफळे ग्रामपंचायतीच्या जागेवर स्थानिकाने अतिक्रमण करून व्यापारी गाळे बांधले आहेत. त्यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. पण, त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ते गाळे सील केले. पण, पुन्हा संबंधितांनी सील काढून त्या गाळ्यांचा वापर सुरू केला आहे. शासकीय जागा बळकावण्याचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये काढले आहे. त्यासंदर्भातील तक्रारींची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याने आत्मदहनाचा विचार करावा लागला, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.
या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी काफळे येथील क्यापारी गाळ्याची फाईल चौकशीसाठी त्वरित मागवून घेत, अतिक्रमण करणाऱयांवर ठोस कारवाईचे आदेश दिले.
























































