दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणानं सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी नदीत उडी घेतली, बुडून मृत्यू

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल अॅक्शन मोडवर असून खोऱ्यात दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान विश्वा नदीमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. यावरून राजकारण सुरू असतानाच आता एक व्हिडीओ समोर आला. यात हा तरुण सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी नदीमध्ये उडी मारताना आणि बुडताना दिसत आहे.

इम्तियाज अहमद मगरे (वय – 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. इम्तियाज मगरे हा कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्गचा रहिवासी होता. मजुरी करून तो घर चालवत होता. दहशतवाद्यांना अन्न आणि आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने कुलगामच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याची कबुलीही दिली होती.

शनिवारी इम्तियाज पोलिसांना दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर घेऊन जाण्यासही तयार झाला होता. रविवारी सकाळी लष्कराचे जवान आणि जम्मू-कश्मीर पोलिसांसोबत दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर जात असताना मगरे पळून गेला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह विश्वा नदीच्या किनाऱ्यावर सापडला. यावरून राजकारण सुरू असतानाच एक व्हिडीओ समोर आला झाला आहे.

दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर जाताना सावधगिरी म्हणून सुरक्षा दलानेच ड्रोनच्या माध्यमातून या भागात करडी नजर ठेवली जात होता. मगरे पळून गेला तो क्षणही यात कैद झाला आहे. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इम्तियाज मगरे हा सुरक्षा दलांना चकवा देऊन अचानक खडकाळ नदीत उडी मारताना दिसतो.

व्हिडीओमध्ये इम्तियाज मगरे नदीत उडी घेतल्यानंतर पोहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र विश्वा नदीच्या वेगवान प्रवाहात तो वाहून गेला आणि बुडाला हे स्पष्ट दिसत आहे. असे असतानाही या घटनेबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांचा सुरक्षा दलाने निषेध केला आहे. याआधी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी इम्तियाजच्या मृत्युमागे कट असल्याचा आरोप केला होता.