
कर्नाटकातील एका व्यक्तीने क्रेडिट कार्डचे पूर्ण बिल चुकवल्यानंतर ते बंद केले. परंतु 10 वर्षांनंतर या ग्राहकाला बँकेने चक्क 33.83 लाख रुपयांचे बिल पाठवले. बँकेच्या या नोटिसीला त्रासून ग्राहकाने अखेर ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने बँकेला चांगलेच फटकारले असून तक्रार करणाऱया व्यक्तीला साडे सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण कर्नाटकातील म्हैसूरमधील आहे. या ठिकाणी राहणाऱ्या वेंकटेशने 27 ऑगस्ट 2010 रोजी आपले क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्या वेळी त्याच्या कार्डवर 15 हजार 500 रुपये बाकी होते. ते सर्व पैसे त्याने चुकवले. बँकेनेही अकाऊंट बंद करण्यात आल्याचे वेंकटेशला सांगितले. परंतु दहा वर्षांनंतर 25 डिसेंबर 2020 बँकेकडून एक कायदेशीर नोटीस पाठवून वेंकटेशकडे 33.83 लाख रुपयांचे कर्ज बाकी आहे, असे सांगितले. यासाठी कॉल, मेसेज आणि अन्य माध्यमाद्वारे त्याला धमकावण्यात आले. या सर्व प्रकाराला कंटाळून वेंकटेशने बँकेच्या नोटिसीविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली. 2024 मध्ये जिल्हा ग्राहक न्यायालयाने वेंकटेशच्या बाजूने निकाल देत बँकेने वेंकटेशला 1 लाखांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले. वेंकटेश या निर्णयाशी सहमत नव्हते. त्यांनी कर्नाटकाच्या राज्य ग्राहक आयोगाकडे अपील केले. 12 फेब्रुवारी 2026 रोजी आयोगाने निकाल देत वेंकटेशला साडेलाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.


























































