
मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार प्रकाश साळुंखे, रामदास कदम, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मंचर शहरात जोडे मारून दहन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले जात आहे. मंचर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. माजी सरपंच दत्ता गांजाळे चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात बेताल व चुकीची वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी करण्यात आले. मंचर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार प्रकाश साळुंखे, रामदास कदम, अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला प्रथम जोडे मारण्यात आले. त्यानंतर त्याचे दहन करण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. मात्र मराठा समाजातील काही नेते बेताल वक्तव्य करत आहेत. मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी समाजातीलच काहीजण प्रयत्नशील आहेत. त्यांचा निषेध सकल मराठा समाज करत असल्याचे यावेळी वसंत बाणखेले म्हणाले. नेत्यांनी बेताल वक्तव्य बंद करावी अन्यथा त्यांना परखड भाषेत उत्तर दिले जाईल असे ॲड सुनील बांगर यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मंचर शहराजवळून गेलेल्या निघोटवाडी बायपास येथील असणारे सर्वपक्षीय नेत्यांचे फलक कार्यकर्त्यांनी सकाळी काढून टाकले. राजकीय नेत्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फलक लावू नये अन्यथा त्यांना रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.


























































