दंडाची रक्कम कमी करुन देतो सांगून लाच मागितली, खासगी व्यक्तीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज मीटर मधून दुसऱ्या दुकानाला अनधिकृत लाईट पुरवठा केल्यानंतर दंड आकारलेल्या दुकानदाराला दंडाची रक्कम महावितरण कार्यालयाचे अधिकारी यांना सांगून कमी करून देतो असे म्हणत 20 हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. अर्जुन हरिचंद्र वायकर (वय 38 रा. मंचर ता. आंबेगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार एका 26 वर्षीय तरुणाने दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणाचे ड्राय क्लीनिंगचे दुकान असून त्यांनी त्याच्या दुकानातील महावितरणच्या मीटर मधून दुसऱ्या दुकानाला अनधिकृतपणे लाईट पुरवठा केला होता. महावितरणच्या वतीने कारवाई करून दंड आकारण्यात आला असता खासगी व्यक्ती अर्जुन वायकर यांने महावितरण कार्यालयाचे अधिकारी यांना सांगून दंड कमी करून देतो असे म्हणत तरुणाकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दि.14 डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन वायकर यांनी स्वतःसाठी वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे पंचा समक्ष सिद्ध झाल्याने त्याच्यावर लासलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शितल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपेश जाधव, महिला पोलीस शिपाई कोमल शेटे, पोलीस शिपाई प्रवीण तावरे यांनी कारवाई केली आहे. पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रूपेश जाधव करत आहे