Miss Universe India 2025 – मनिका विश्वकर्माने जिंकला मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब

मिस युनिव्हर्स इंडिया 2025 याची मानकरी यंदा राजस्थानची मनिका विश्वकर्मा ठरली आहे. आता ती थायलंडमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2025 मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिने (18 ऑगस्ट)ला हा प्रतिष्ठित मुकुट जिंकला आहे. या विजेतेपदासाठी देशभरातून 48 स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. उत्तर प्रदेशची तान्या शर्मा पहिली उपविजेती, हरियाणाची मेहक धिंग्रा दुसरी उपविजेती आणि अमिशी कौशिक तिसरी उपविजेती ठरली.

राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मनिका विश्वकर्मा हिला मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब देण्यात आला. या भव्य कार्यक्रमात मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंघा हिने तिच्या उत्तराधिकारीला मुकुट घातला. ज्युरी सदस्यांमध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचे मालक निखिल आनंद, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, प्रसिद्ध बॉलीवूड स्टायलिस्ट अस्ले रोबेलो, बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक फरहाद सामजी अशी लोकप्रिय नावे होती.

शोची सुरुवात एका जबरदस्त डान्स नंबरने झाली ज्यामध्ये सर्व स्पर्धकांनी भाग घेतला. यानंतर स्पर्धकांनी त्यांचा परिचय दिला, स्पर्धेचा पुढचा टप्पा स्विमसूट राउंड होता, ज्यामध्ये स्पर्धकांनी त्यांचा फिटनेस आणि आत्मविश्वास दाखवला. संध्याकाळी गाऊन राउंडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मिस युनिव्हर्स इंडियाचे जनसंपर्क अधिकारी सर्वेश कश्यप म्हणाले की, टॉप 20  नंतर, स्विम शूट राउंड दरम्यान, टॉप 11 स्पर्धकांनी अंतिम प्रश्नोत्तर फेरीत त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि आत्मविश्वासाने ज्युरींची मने जिंकली. शेवटी मनिका विश्वकर्माला मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा मुकुट देण्यात आला.

मनिका आता (21 नोव्हेंबर 2025) थायलंडमधील नोंथाबुरी येथील इम्पॅक्ट चॅलेंजर हॉल ऑफ पॅक क्रेट येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे.