
अन्नदात्या शेतकऱयांच्या जीवाशी खेळणाऱयांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. शेतकऱयांना बोगस बियाणे, कीटकनाशक खते विकणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री, अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.
विधानसभा सदस्य काशीनाथ दाते यांनी पाचेगाव (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) मध्ये कपाशीच्या बियाणांच्या विक्रीमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले की, शेतकऱयांना बोगस बियाणे, कीटकनाशके, खते यांची विक्री तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱया विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पाचेगाव येथील मे. त्रिमूर्ती अॅग्रो सेंटरची तपासणी केली असता तेथे जादा दराने बियाणांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने त्यांचा बियाणे विक्री परवाना व कापूस विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.
शेतकऱयांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी अहिल्यानगर जिह्यात 15 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत कृषी विभागाने बियाणे कायद्यांतर्गत 2 आणि खत नियंत्रण कायद्यांतर्गत 3 गुन्हे दाखल करून 12.34 लाखांचा साठा जप्त केला आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केलेल्या 35 निविष्ठा विक्री परवान्यांवर निलंबन रद्दची कारवाई केली आहे अशी माहिती कोकाटे यांनी दिली.