
सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. नगर परिषद निवडणुकीच्या रणांगणात तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते व राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता थेट भारतीय जनता पक्षावर जहरी टीका केली आहे. ‘भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष असून फोडाफोडीतच भाजप नेत्यांचे आयुष्य गेले’, अशी तोफ कोकाटे यांनी सिन्नर येथे प्रचारसभेत डागली.
इकडून फोड, तिकडून फोड अशा फोडाफोडीत भाजप पूर्णपणे बाटला आहे आणि त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते बिचारे घरी बसले आहेत. अनेकांना उमेदवारी मिळाली नाही, इकडून तिकडून आणून, ओढाताण करून उमेदवाऱया दिल्या. आपल्याला तसे काही करायचे नाही. मी अजितदादांचा पठ्ठय़ा आहे. ओठात एक अन् पोटात एक, हे मला जमत नाही. जे करायचे, बोलायचे ते ठोस अन् खरे बोलतो. त्यामुळे माझे खाते बदलले. पण मला काही फरक पडत नाही, असे माणिकराव म्हणाले.
‘भाजपने अगोदर माझ्या भावाला ओढून घेत फोडाफोडी केली आणि आता हेमंत वाजे यांच्या रूपाने खासदार राजाभाऊ वाजे यांचे घर पह्डले. या फोडाफोडीचा भाजपला काडीचाही फायदा होणार नाही, असे कोकाटे म्हणाले. महाराष्ट्रात फिरत असताना जास्त लढाया आणि संघर्ष महायुतीतल्या पक्षांमध्ये आपसातच सुरू असल्याचं जाणवलं, असं विधानही त्यांनी केलं.’
शिंदेंना आताच एवढा कळवळा का?
कोकाटे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शिंदे जिथे जातात तिथे ती नगरपालिका दत्तक घेत असल्याचे जाहीर करून टाकतात. आत्ताच त्यांना एवढा कळवळा का आला, असा सवाल कोकाटे यांनी केला. शिंदे प्रत्येक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करतात, पण ही योजना महायुतीची आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील या संकल्पनेला पाठिंबा दिला होता हे विसरून चालणार नाही, असे कोकाटे म्हणाले.
शेतकऱयांना कर्ज देऊ नका
माणिकराव कोकाटे यांनी यावेळी शेतकऱयांबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. शेतकऱयांना कर्ज देऊ नका, त्यांना 70 टक्के अनुदानावर योजना द्या, फुकट दिलं की गोंधळ होतो, असे संतापजनक विधान त्यांनी केले.
अजितदादांच्या खासदारांचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार
महायुतीतील धुसफूस दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे आजच्या सर्वपक्षीय बैठकीतही पाहायला मिळाले. या बैठकीवर अजित पवारांच्या गटाने बहिष्कार टाकला, तर शिंदे गटाचे गटनेते श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी खासदार नरेश म्हस्के यांनी हजेरी लावली. साधारणपणे सर्वपक्षीय बैठकांना अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित असतात, मात्र या दोघांनीही आज पाठ फिरवली. बिहारमध्ये राष्ट्रवादीने निवडणूक लढविण्यावरून अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. पटेल यांच्या गैरहजेरीमागे हे कारण असल्याचे समजते. तटकरेंशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.





























































