मणिपूरमध्ये हिंसाचाराचं सत्र कायम, आणखी 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूर येथे सुरू झालेला जातीय हिंसाचार अद्यापही थांबलेला नसून दिवसेंदिवस बळींच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. बळींची आकडेवारी 160 इतकी सांगण्यात येत असली तरी वास्तवात ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे. शनिवारी या आकडेवारीत अजून भर पडली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका आयआरएफ जवानाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीही गोळीबार सुरू होता. क्वाता परिसरात काही दंगेखोरांनी मैतेई समुदायाच्या तीन जणांची त्यांच्या घरात हत्या केली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्यात आले. त्यानंतर काही तासांनी चुराचांदपूर येथे कुकी समुदायाच्या दोन जणांची हत्या झाली. या हत्यांचा परस्परांशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

3 मे पासून मणिपुरात कुकी आणि मैतेई समुदायात हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत 160 जणांचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी विष्णुपूर येथे सैन्याच्या शस्त्रागारावरही हल्ला करण्यात आला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता, त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर शस्त्रागारातून अनेक शस्त्रं आणि दारुगोळा पळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.