मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी वाढवली, पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल डेटा सेवा ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fresh protests in manipur churachandpur over new bjp government formation

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट आणि डेटा सेवा (VPNसह) आणखी दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी राज्याच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केला.

इम्फाळ वेस्ट, इम्फाळ ईस्ट, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध लागू राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात बिष्णुपूर येथे एका पॅरामिलिटरी छावणीवर जमावाने हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला, तर 29 जण जखमी झाले. यापूर्वी स्फोटात 5 वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या 6 महिन्यांच्या बहिणीचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात काही भागांत कर्फ्यूही लागू करण्यात आला होता.

सोशल मीडियावरून अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरल्यास जमाव भडकण्याची शक्यता आहे. विशेषतः व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यांसारख्या माध्यमांमुळे हिंसा, जाळपोळ किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मोबाईल डेटा सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण असल्याने निर्बंध कायम ठेवणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी मंगळवारी “अस्थिर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती”चा दाखला देत तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. बुधवारी ब्रॉडबँड सेवा (Internet Leased Line आणि Fiber to the Home) अटींसह सुरू करण्यात आल्या, मात्र मोबाईल इंटरनेटवरील बंदी कायम ठेवण्यात आली. शुक्रवारी ही बंदी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली होती.

दरम्यान, मे 2023 पासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत किमान 260 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 60,000 लोक विस्थापित झाले आहेत. हा संघर्ष प्रामुख्याने मैतेई समुदाय आणि कुकी समुदाय यांच्यात सुरू झाला होता. मैतेई समुदाय प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्यात राहतो, तर कुकी समुदाय डोंगराळ भागात वास्तव्यास आहे.

हिंसाचारानंतर दोन्ही समुदायांनी आपापल्या भागात माघार घेतली असून सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या दरम्यान बफर झोन तयार केले आहेत. त्यामुळे राज्यात जणू काही विभागणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.