गेल्या एक ते दीड वर्षापासून मणिपूर धगधगत असून लोकांनी खूप काही सोसले आहे. मणिपूरची समस्या सोडवण्याकडे केंद्र सरकार, पंतप्रधान, गृहमंत्री यांनी पाठ फिरवली आहे. मणिपूरची समस्या सोडवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावे अशी सर्वांची अपेक्षा आहे, मात्र पंतप्रधान मणिपूरच्या समस्येवर साधे एक मिनिट चर्चा करायला तयार नाहीत. जगभरात भ्रमंती करणाऱ्या पंतप्रधानांनी हिंसाचार सुरू झाल्यानंतर मणिपूरमध्ये एकदाही पाऊल टाकले नाही, अशी खंत मणिपूर येथील पत्रकारांनी व्यक्त केली.
सरहद संस्थेतर्फे ‘धगधगते मणिपूर’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘मन्नबा टीव्ही’चे सहयोगी संपादक पैशम यैफबा, ‘द मॉर्निंग बेल’चे सहयोगी संपादक सरोजकुमार शर्मा, मणिपूर सरकारचा उत्कृष्ट संपादक पुरस्कारप्राप्त ब्रोझेंद्रा निगोम्बा या तीन संपादकांनी मणिपूरची सध्याची परिस्थिती आणि त्यामागची कारणे उलगडून सांगितली. ज्येष्ठ पत्रकार नीलेश खरे, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार आदी उपस्थित होते.
यावेळी निगोम्बा म्हणाले, आम्हाला शांत आणि एकात्म मणिपूर हवा आहे. मात्र कुकी आणि मैतई यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचाराची सुरुवात कुकाRकडून झाली आहे. त्यांना वेगळं अस्तित्व हवं असल्यानं ते हिंसाचाराचा मार्ग निवडत आहेत. मैतई आणि कुकी समाजातील सुमारे 16 हजार लोक रिलिफ कॅम्पमध्ये आहेत. या हिंसाचारात हजारो लोकांची घरे भस्मसात झाली आहेत. यामागे ड्रग्ज माफियांचा सर्वात मोठा हात आहे. धगधगते मणिपूर शांत करण्यासाठी चर्चा आणि संवादातून मार्ग काढला पाहिजे.
सरोजकुमार म्हणाले, गेल्या पंधरा ते सोळा महिन्यांच्या काळात मणिपूरच्या लोकांनी खूप काही सोसले आहे. मणिपूरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होईल याचे कोणतेही चित्र दिसत नाही, मात्र केंद्राने हस्तक्षेप केल्यास हे चित्र नक्की बदलेल.
संजय नहार म्हणाले, मणिपूरच्या प्रश्नावर चर्चा करून उपयोग नाही, तर ही समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत. यावेळी नीलेश खरे यांनी मनोगत व्यक्त केले.