मानखुर्द पोटनिवडणुकीत 42 टक्के मतदान, आज निकाल; 10 वाजता मतमोजणीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141मध्ये आज झालेल्या पोटनिवडणुकीत 42 टक्के मतदान झाले. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत या प्रभागात 57 टक्के मतदान झाले होते. त्यात 15 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र मतदान घटले असले तरी शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. एकूण 18 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून लगेच निकाल जाहीर होणार आहे.

पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. दुपारी दीड वाजेपर्यंत 25.56 टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत 32.73 टक्के मतदान झाले. दुपारी साडेबारानंतर मतदारांची गर्दी काहीशी ओसरली. दुपारी साडेतीननंतर मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे मतदानाची वेळ संपेपर्यंत 42 टक्के मतदान झाले. एकूण 13 हजार 476 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 7344 पुरुष तर 6132 स्त्राr मतदारांचा समावेश आहे. 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत 56.87 टक्के मतदान झाले होते. पालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक-141मधून काँग्रेसच्या तिकिटावर विठ्ठल लोकरे निवडून आले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक 18 उमेदवारांमध्ये झाली. शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ अहमद, एमआयएमचे सद्दाम हुसेन इमाम उद्दीन आणि समाजवादीचे खान जमीर भोले यांच्यासह 11 अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढवली.

पनवेल महानगरपालिका पोटनिवडणुकीत 31 टक्के मतदान

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.19 ‘ब’मध्ये आज पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत फक्त 31.03 टक्के मतदान झाले. शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे व भाजपच्या रुचिता लोंढे यांच्यात मुख्य लढत होत असून उद्या शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. या आजच्या निवडणुकीत 3858 महिला मतदारांनी तर 4939 पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. अखेरच्या टप्प्यात सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सोसायटी येथील बुथकर महाविकास आघाडीच्या एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.