मनमाडमध्ये पांझण-रामगुळणा नदीला पूर

904

 गेल्या 15 दिवसांपासून मनमाड शहर आणि परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱयांना मेटाकुटीला आणले असतानाच शुक्रवारी मध्यरात्री या पावसाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. पांझण-रामगुळणा नदीला पूर आला. या पुरामुळे नदीपात्रालगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. दरम्यान, पाण्याचा वाढता प्रवाह पाहता नागरिकांना घराबाहेर काढण्यात आले आहे. एकंदरीत मनमाडकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

भरपावसात पुरामुळे 400 घरांत पाणी शिरले तर 1500 वर नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले. दोन दुचाकी, ऍपे रिक्षा, पाच टपऱया आणि दोन चारचाकी वाहने पावसाच्या पाण्याने वाहून नदीच्या कडेला अडकली. या पावसाने मोठय़ा प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले, पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री पाच तासांत 135 मिलीलिटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. या पावसाने गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
शहरांतील रस्त्यावरून अक्षरशः गुडघाभर पाणी वाहत होते. तर पांझण आणि रामगुळणा या दोनही नद्या संगमावरून पाण्याचा जोर वाढू लागला आणि मध्यरात्री दीडनंतर या नद्या अक्षरशः दुथडी भरून वाहू लागल्या. महापुराची परिस्थिती उद्भवली. नगरपालिका, अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा, पोलिस आणि विविध सेवाभावी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नदीकाठच्या लोकांना सावधनतेचा इशारा दिला. मध्यरात्री ध्वनिक्षेपकावरून तातडीने नागरिकांना घरे रिकामी करण्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक यात प्रामुख्याने गुरुद्वाराच्या मागे, पुढे गवळीवाडा, ईदगाह, टकार मोहल्ला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातील नदीकाठच्या लोकांना सतर्क करण्यात आले. त्यामुळे नागरिक घरातील सामान घेऊन बाहेर पडले.

शिवाजी नगर पूल, गुरुद्वारामागील पूल, ईदगाह आठवडे बाजाराला जोडणारा जुना पूल, आठवडे बाजार ते कॉलेज रोडवरील पूल असे पाच पूल पुराच्या पाण्याखाली गेले. या पुलांवरून अक्षरशः पाण्याचा लोंढा वाहत होता. परिणामी या पाचही पुलांच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेडस् लावून हे पूल मध्यरात्री वाहतुकीला बंद केले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला. स्थलांतरित नागरिकांची मनमाड गुरुद्वारा, एचएके हायस्कूल, मराठी शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर आदी ठिकाणी तत्काळ निवासाची व्यवस्था करण्यात आली.

रामगुळणा-पांझण नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळल्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला तर पुलाखालील पाइपमध्ये अडकलेल्या पानवेली काढण्यासाठी दोन जेसीबी लावण्यात आले. येवल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, नांदगावचे तहसीलदार मनोज देशमुख, प्रभारी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, माजी आमदार जगन्नाथराव धात्रक यांच्यासह शासकीय अधिकारी, नगरसेवक यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. बुधलवाडी भागात मधुकर आहिरे यांचे राहते घर पावसामुळे पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

खुर्चीला हार-फुले घालून विभागाला श्रद्धांजली
मनमाड शहरात शुक्रवारी रात्रीच्या संततधार पावसामुळे मोठा पूर येऊन नदीलगतच्या रहिवाशी वस्त्या या पाण्यात जाऊन रहिवाशांचे सर्व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या व मोठी हानी झाली. परिसरातील तरुणांनी शिवसैनिकांनी वेळीच मदतकार्य केल्याने जीवितहानी टळली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनसुद्धा कोणीही अधिकारी दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात आलेले नव्हते. म्हणून शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, उपप्रमुख खालिद शेख, संघटक महेंद्र गरुड, बबलू शेख, रिझवान कुरेशी युवासेनेचे सचिव स्वराज देशमुख व संतप्त शिवसैनिकांनी फुले, हार खुर्चीला वाहून या मुर्दाड विभागाला श्रद्धांजली वाहिली व यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी नवनिर्वाचित शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडे केली.

सुरुवातीला पावसाचा वेग कमी होता. नंतर तो वाढला. मध्यरात्री अडीचनंतर मोठा पूर आला. त्यामुळे नगरपालिका, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तत्काळ सक्रिय झाल्या. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविता आले. जीवितहानी झाली नाही. चार पूल पाण्याखाली गेल्याने सुरक्षेचे उपाय म्हणून बॅरिकेडस् लावून दोरखंड लावण्यात आले. 1500 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

नदीकठच्या लोकांचे वेळीच स्थलांतर करण्यात आले. तरीदेखील पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले. मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनमे करण्यासाठी पाच तलाठी व पालिकेचे अधिकारी नेण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या