
हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकाजवळ पादचारी पूल नसल्याने त्या भागातील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यास प्रचंड अडचण येत असल्याने पादचारी पूल तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत आज औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
रे रोड स्थानकाजवळ पादचारी पूल उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवासी यांच्याकडून गेली अनेक वर्षे होत आहे. त्यासंदर्भात आपण महारेलच्या अधिकाऱयांची भेट घेऊन चर्चाही केली. पादचारी पूल आणि तिकीटघराच्या आराखडय़ाला मध्य रेल्वे आणि महानगरपालिकेची मान्यता मिळाली आहे. पुढील कार्यवाहीसाठी महारेलने निधीला मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. ती न मिळाल्याने पुलाचे बांधकाम रखडले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शासनाने तशा सूचना पालिकेला द्याव्यात, अशी मागणी आमदार जामसुतकर यांनी केली.