
मुंबईत एनटीसीच्या ज्या गिरणी आहेत त्या गिरणींच्या चाळी या 100 वर्षे जुन्या असून त्यांचा तातडीने पुनर्विकास करा. यासाठी शासनाने धोरण निश्चित करावे, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसूतकर यांनी विधानसभेत केली.
एनटीसीच्या ताब्यात असलेल्या टाटा, कोहिनूर, मुंबई टेक्सटाईल, मधुसूदन, दिग्विजय, जाम, सीताराम, युनायटेड मिल 1 आणि 3 या नऊ गिरण्यांच्या 11 चाळी उपकरप्राप्त चाळी आहेत. यामध्ये जवळपास 2062 रहिवासी राहत आहेत. मध्यंतरी म्हाडाने एनटीसीच्या जमिनीच्या पुनर्विकासाची व्यवहार्यता तपासण्यासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती केली होती. त्यांनी एनटीसीच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक घेतली. या चाळींचा 33ः7 आणि 33ः9 अंतर्गत तातडीने पुनर्विकास करण्यात यावा यासाठी सरकारने धोरण आखावे अशी सूचना जामसूतकर यांनी केली.
मुंबई पालिकेच्या बालवाडीमध्ये असणाऱया शिक्षिका व मदतनीस यांना संस्थाचालक पोलिसांची धमकी देऊन कामावरून कमी करतात आणि पैसे घेऊन नवी नियुक्ती करतात. बालवाडीत काम करणाऱया या शिक्षकांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही जामसूतकर यांनी केली.
पालिकेच्या नोकरीत पीटी केसमध्ये येणाऱया अडचणी दूर करा
मुंबई पालिकेचे जे कर्मचारी मृत झाले आहेत, निवडणुकीच्या डय़ुटीवर असताना जे मृत झाले आहेत त्यांच्या वारसांना पीटी केसमध्ये नोकरी मिळविण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसूतकर यांनी केली. मुंबई पालिकेच्या मृत कामगारांच्या वारसांना पीटी केसमध्ये नोकरी मिळवताना कामगांची पेन्शन मिळताना अडचणी येत आहेत. त्या तत्काळ दूर करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.