
हिंदुस्थानचे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच पाकिस्तानला खणखणीत इशारा दिला. दुसऱयाला पुढे रेटून दहशतवादी कारवाया करण्याच्या कुरापती थांबवा, अन्यथा तुमच्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्याचा अधिकार हिंदुस्थानकडे आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत दम देत त्यांनी पाकडय़ांच्या दहशतवादी कारनाम्यांचा बुरखा फाडला.
महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल नरवणे यांनी मंगळवारी मावळते लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना पाकिस्तानला फैलावर घेतले. पाकिस्तान घडवत असलेल्या कोणत्याही दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याचे अनेक पर्याय आमच्या हाती आहेत. त्यांचा दहशतवाद थोपवण्यासाठी भक्कम रणनीती बनवली आहे. स्वत:च्या कुरापती लपवण्यासाठी दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे, असे जनरल नरवणे म्हणाले.
नवीन सैन्य कल्याण विभागाची स्थापना
जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नवीन सैन्य कल्याण विभाग स्थापन केला आहे. हा विभाग लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्य दलांसंबंधी खरेदीचे काम सांभाळणार आहे.
34 वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी माणूस लष्करप्रमुख
जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यानंतर जवळपास 34 वर्षांनी मंगळवारी जनरल नरवणे यांच्या रुपात पुन्हा एकदा मराठी माणूस लष्करप्रमुख पदी विराजमान झाला आहे. त्यामुळे या दिवसाची महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. मावळते लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे मंगळवारी निवृत्त झाले. त्यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार जनरल नरवणे यांनी पदभार स्वीकारला. जगातील सर्वात शक्तिशाली आणि 13 लाख जवानांची फौज असलेल्या लष्कराचे नेतृत्व ते सांभाळणार आहेत.
लष्कराची प्रतिमा अधिक उंचावेल – जनरल रावत
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होताना लष्करातील जवान व त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद दिले. नवीन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नेतृत्वाखाली लष्कराची प्रतिमा अधिक उंचावेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ते बुधवारी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’चा पदभार स्वीकारणार आहेत. साऊथ ब्लॉकच्या प्रांगणात मंगळवारी पार पडलेल्या समारंभात लष्कराच्या जवानांनी त्यांना मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) दिली. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.



























































