कश्मीरमधील 40 पर्यटन स्थळे पुन्हा उघडली, पहलगाम हल्ल्यानंतर बंद केलेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहलगामच्या बैसारनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली जम्मू-कश्मीरमधील 40 हून अधिक पर्यटनस्थळे पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आणखी 14 पर्यटनस्थळे उघडण्याचे निर्देश दिले. यामध्ये कश्मीरमधील 11 तर जम्मूतील 33 पर्यटन स्थळांचा समावेश आहे. बाकीचे पर्यटनस्थळे याआधीच उघडली आहेत. ज्या बैसारण खोऱ्यात हल्ला झाला होता ते बैसारण खोरे अद्याप बंद आहे.

कश्मीरातील खुल्या झालेल्या पर्यटन स्थळांमध्ये बडगामचे युसमर्ग आणि दूधपथरी, अनंतनागच्या कोकरनाग येथील दंडीपोरा पार्क, शोपियांचे पीर की गली, डुबजान आणि पद पावन, श्रीनगरचे अस्तानपोरा आणि ट्यूलिप गार्डन, गांदरबलचे थाजवास ग्लेशियर आणि हंग पार्क, बारामुल्लाचे वुलर आणि वटलाब यांचा समावेश आहे. तर जम्मू विभागात रियासीचे देवी पिंडी, रामबनचे महू मंगट आणि किश्तवाडचे मुगल मैदान खुले करण्यात आले आहे. बर्फ हटवल्यानंतर बांदीपोराचे गुरेज आणि अथवातू, कुपवाड्याचे बंगस आणि रामबनचे रामकुंडही उघडले जातील. सर्व ठिकाणी सुरक्षा दल तैनात केले आहे.