मानवत बसस्थानक केवळ नावाचेच, वृक्षाचा आधार घेत प्रवासी करतात बसची प्रतिक्षा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्याम झाडगावकर । मानवत

शहरातील बसस्थानकातील अनेक गैर सुविधेमुळे प्रवासी बसस्थानकाच्या लगत असलेल्या वृक्षाच्या छायेखाली आधार घेत बसची प्रतिक्षा करतात. बसस्थानकातील व्यापारी संकुल आणि उपहारगृहे या केवळ शोभेच्या वस्तु बनल्या आहेत. परिणामी बसस्थानक केवळ नावालाच उरले असल्याने या बसस्थानकाचा जिर्णोद्धार करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.

मोठी कापडाची बाजारपेठ म्हणून मानवत शहराची ओळख आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता जुने बसस्थानक रद्द करुन पाथरी रोडला नवीन बसस्थानक उभारण्यात आले. बसस्थानकाची उभारणीकरताना व्यापारी संकुल, उपहारगृह, सुलभ शौचालय तसेच मोकळा परिसर आदींची रचना करण्यात आली होती. केवळ देखभाली अभावी या बसस्थानकाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथे राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयासाठी केवळ एक खोली कार्यरत आहे. संपूर्ण बसस्थानक ओसाड झाले आहे. प्रवाशी देखील बसस्थानकाचा वापर न करता, बसस्थानकालगत असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली बसून एस.टी. बसची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. बसचालक हे सुद्धा आपले वाहन प्लॅटफार्मनुसार न लावता झाडाच्या बाजुलाच आणून उभी करतात. बसस्थानक असून नसल्यात जमा आहे. दुपारच्यावेळेला अडोसा म्हणून तळीराम मुक्त हैदास घालतात. या तळीरामांना आवर घालण्यासाठी रा.प.चा कोणताही कर्मचारी धजावत नाही.

पाथरी आणि परभणी या मार्गासाठीच या बसस्थानकातून गाड्या धावत असतात. बसचालक मनमानी पद्धतीने बसस्थानकात कोठेही गाडी थांबविली जाते. अनेक गाड्यांना फलक नसल्यामुळे सदर बस ही पाथरीकडे जाणार की परभणीकडे याचा नामोल्लेख नसल्याने महिला आणि अबालवृद्धांची मोठी परवड होत आहे. अनेक गाड्यांना नामफलक नसल्याने वाहनचालकास विचारणा केली असता, उत्तर देण्याचे टाळाटाळ करत केवळ हातानेच मार्ग दाखवितात. त्यावरुन प्रवाशी सदर गाडी ही पाथरीकडे कि परभणीकडे याचा अंदाज बांधतात. बसगाड्या या फलाटावर लावण्यात याव्यात अशी मागणी सर्वचस्तरातून जोर धरु लागली आहे. त्यातच भरीस भर म्हणजे मानव विकासच्या गाड्यांना देखील नामफलक नसल्याने विद्याथ्र्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.