मीरा-भाईंदरमधील भाजप, अजित पवार गटाचे कार्यकर्ते शिवसेनेत

मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदीप तिवारी आणि अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष आझाद पटेल यांनी आज त्यांच्या अनेक सहकाऱयांसह शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

मीरा-भाईंदर शिवसेनेत विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवता येऊ शकतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भाईंदर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ताकदीनिशी फडकवू, असा विश्वास यावेळी संदीप तिवारी आणि आझाद पटेल यांनी व्यक्त केला. यावेळी तिवारी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 15 व भाईंदर पश्चिम येथील राई, मोरवा व मुर्धा परिसरातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, मीरा-भाईंदरचे निरीक्षक उद्धव कदम, प्रदीप उपाध्याय, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मीरा-भाईंदर जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे सदानंद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख मोझेस चिनप्पा, शहरप्रमुख प्रशांत सावंत, आस्तिक म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.