
>> रतींद्र नाईक
शिवकालाची अस्सल ओळख म्हणजे सर्व मराठा वीरांची शस्त्रं. ही ऐतिहासिक शस्त्रं पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब आणि त्याच्या मोघलशाहीला शह देत महाराजांनी स्वराज्य उभे केले. मूठभर मावळे आणि गनिमीकाव्यासह महाराजांनी अनेक युद्धे जिंकली. या युद्धांमध्ये मराठय़ांना साथ लाभली ती धारदार शस्त्रांची. या शस्त्रांनीच गनिमांची मुंडकी छाटत मराठय़ांनी गडकोट सर केले. अनेक लढायांमध्ये शत्रूचे पानिपत करणारी ही तीक्ष्ण शस्त्र पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे.
मराठय़ांच्या शस्त्रास्त्रांचा इतिहास आणि त्याची माहिती सांगणारे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भरले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान आणि हिंदवी स्वराज्य महासंघ पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन रविवार, 24 नोव्हेंबरपर्यंत इतिहासप्रेमींसह पुणेकरांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात केवळ ऐतिहासिक शस्त्रच नाहीत तर शिवकालीन चित्रे, वस्त्र, फेटे, सनद, ताम्रपट आदी दुर्मिळ साहित्यांचा अभ्यास करता येणार आहे.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनात हिंदवी स्वराज्यासाठी झटणाऱया पंचवीसहून अधिक मराठा घराण्यांनी सहभाग घेतला आहे. कंक, दाभाडे, जेधे, विंचूरकर, शिरोळे, बर्गे, गंधे अशा अनेक मराठा घराण्यांचा यामध्ये सहभाग असून या घराण्यांनी पिढय़ान्पिढय़ा जतन करून ठेवलेली शस्त्र, वस्त्र आणि कागदपत्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनामुळे कधीही न पाहिलेली शस्त्र, अवजारे आणि दस्ताऐवज या ठिकाणी मांडण्यात आल्याने इतिहासप्रेमींना माहितीचा नवा खजिना मिळाल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजामगुंडे यांनी सांगितले.
या प्रदर्शनात विशेष म्हणजे तलवार, बिछवा, वाघनखे अशी विविध शस्त्र याशिवाय चिलखत, ऐतिहासिक चित्रे, राजे-महाराजे, सेनापती यांचे पोशाख, मानपत्रे, ताम्रपट, सनद, मोडी लिपीतील पत्रे आदी दस्तावेज पाहता येतील. विशेष म्हणजे 200 वर्षांपूर्वीचा सारीपाट आणि हस्तीदंतापासून बनवलेल्या सोंगटय़ाही प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
तलवार – शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रांना विशेष महत्त्व होते. या तलवारींनी अनेक युद्धे गाजवली असून त्यांना वेगळी ओळख आहे. खंडा, कर्नाटकी धोप, राजपुती तलवार, समशेर, गुर्ज, पट्टा, आरमार आणि मानकरी आदी तलवारींचे प्रकार असून मराठय़ांची खंडा आणि धोप या प्रदर्शनात पाहायला मिळेल. सरसेनापती येसाजी कंक यांनी वापरलेली मराठा धोप तसेच वक्रधोप या प्रदर्शनात मांडण्यात आली असून या तलवारी बघण्यासाठी अभ्यासक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या वाडय़ावर भेट देत असल्याची माहिती सिद्धार्थ कंक यांनी दिली. तसेच खंडेराव दाभाडे यांच्या घराण्यातील तलवारही प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
मोडी लिपीतील सनद – ग्वाल्हेरचे सरदार सोमजी गरुड नाईक देशमुख घराणे. या घराण्यातील सरदारांनीप्रामुख्याने पानिपतच्या लढाईत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांना वतन बहाल करण्यात आले. तरी सनदही त्यांना देण्यात आली. मोडी लिपीतील ही सनद असून सन 1790 ते 1820 दरम्यानच्या कालखंडात ती देण्यात आली आहे. शिवाय ताम्रपट, 200 वर्षांपूर्वीचा सारीपाट, सोन्याने मढवलेले अंगरखे प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
शिसवीचा पाटा – मराठय़ांचा खुराक हा भारदस्त असे. सुकामेव्यासह इतर पदार्थ ते या पाटय़ावर वाटत असत. परंतु या पाटय़ाचे एक वैशिष्टय़ म्हणजे हा पाटा दगडाऐवजी शिसवीच्या लाकडापासून बनविण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर पाटय़ाचा वरवंटा मात्र ग्रेनाईटच्या दगडापासून बनविण्यात आला आहे. या पात्याचे वजन जवळपास 50 ते 60 किलोदरम्यान आहे. हा पाटाही प्रदर्शनात पाहता येणार असून ऐतिहासिक पाटय़ाची निगा रणजीत सिंह गरुड देशमुख वर्षानुवर्षे राखत आहेत.


























































