मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चे शांततेत पार पडले. मात्र, काही मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. ते गुन्हे काटेकोरपणे कायद्याच्या चौकटीत ठेवून मागे घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचादेखील हाच विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्म सोहळ्यासाठी आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, कायदेशीर बाबी पडताळून गुन्हे मागे घेतले जातील. किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांगीण प्रयत्न केले. मात्र, आता खऱया अर्थाने रयतेचे राज्य आले आहे. गोरगरीब शेतकऱयांना हे आपले राज्य वाटत असल्याने तुम्ही टाकलेला विश्वास सार्थकी लावून जातीय सलोखा राखण्याचे काम सरकार करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवनेरीच्या विकासासाठी 23 कोटी
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिवनेरीच्या विकासासाठी 23 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. येथील विविध विकासकामे मार्गी लावण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पुरातत्व विभाग आदी शासकीय विभागांच्या माध्यमातून शिवनेरी परिसरात विकासकामे करण्यात येतील.