
सामना प्रतिनिधी । तुळजापूर
आरक्षणासंबंधी तहसीलदारांना निवेदन देण्यास गेलेल्या मराठा समाज बांधवांना उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी अपमानास्पद वागणूक देत बाहेर काढल्याचा आरोप करीत संतापलेल्या मराठा युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहने अडवली तसेच टायर जाळून निषेध नोंदविला. दरम्यान, गिरासे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या शुक्रवार, २० जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील परळी येथे सुरू असलेल्या मराठा ठोक आंदोलनाला पाठींबा देण्यासंबधीचे निवेदन देण्यासाठी काही मराठा युवक गुरूवारी दुपारी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. या वेळी तहसीलदारांच्या दालनात उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी तरुणांना अरेरावीची व उध्दट भाषा वापरली तसेच त्यांना अपनास्पदपणे बाहेर काढले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गिरासे यांच्या वर्तणुकीबद्दलची वार्ता शहरात पसरली आणि क्षणार्धात मोठ्या संख्येने मराठा तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. यावेळी संतापलेल्या मराठा तरूणांनी तुळजापूर-सोलापूर महामार्ग अडवला. यावेळी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली.
आज रास्ता रोको
मराठा समाजाविषयी अपमानास्पद, उध्दट, जातीवाचक आणि अरेरावीची भाषा वापरणाऱ्या गिरासे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक २० जुलै रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनावर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, विजय भोसले, महेश अमृतराव, शीतल अमृतराव, रोहन भांजी, दिनेश बागल, मनोज माडजे, प्रविण जटाळ, शुभम भिसे आदींच्या स्वाक्षरी आहेत.































































