मराठा आरक्षणासाठी दोन तास रस्ता रोको

29

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील शिवली मोड येथे मराठा आरक्षणासाठी आज शनिवारी सकाळी ११ ते १ असा दोन तास रस्ता रोको करण्यात आला. राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्य़ावरून सुरू झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. कालच औसा तालुक्यामध्ये आरक्षण मिळण्याच्या कारणावरून दोन तरूणांनी आत्महत्या केली. आंदोलन शांततेत राहावे म्हणून पोलिसांकडून मोठा फौजफाटा तयार करण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेलकुंड येथील महसूल मंडळ अधिकारी सुरेश सोनकांबळे यांना निवेदन देण्यात आले.

औसा तालुक्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या कारणावरून दोन तरूणांनी आत्महत्या केली. सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने आणि तळणी येथील सुमीत विलास सावळसुरे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी या निवेदनात देण्यात आली.

यावेळी औसा तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आकाश पाटील, नागेश मुगळे, अक्षय साळुंके, संतोष सुर्यवंशी, दादा साहेब पवार, विवेकानंद भोसले, सुरज बारोटे, अर्जून यादव, हनुमंत पवार, धर्मराज पवार, बालाजी साळुंके, महेश साळुंके, श्रीहरी उक्ते, सिद्धार्थ शिंदे यांसह मोठ्या प्रमाणात महिलांचा व तरुणांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या