
सामना प्रतिनिधी। औसा
मराठा आरक्षणाबरोबरच इतर मागण्यांसाठी सोमवारी औसा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सेलू व तळणी येथील दोन युवकांनी मराठा आरक्षण व नापिकीमुळे आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी. मेगा महाभरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण आणि औसा येथे मराठा भवन उभा करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून त्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदनही दिले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आंदोलनामुळे दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
तालुक्यातील करजगाव पाटी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही याकरिता बलीदान द्यावे लागत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत आंदोलन करून २ तास रास्ता फत्तेपुर व करजगाव पाटी रास्ता रोको केले. पेशंटच्या अँब्युलन्सला ही वाट करून देत शांततेत आंदोलन करण्यात आले. मराठा समाजास शासनाने त्वरित आरक्षण लागू करण्यात यावे व आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत २५ लाख रुपये देण्यात यावे व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा प्रमुख मागण्यासह सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी कदम व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
summary…maratha protest and rasta roko































































