
सामना प्रतिनिधी । कायगाव
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनावेळी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिंदे कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला. त्यानंतर ज्या ठिकाणी शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काकासाहेब शिंदे यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत, तसेच त्यांच्याभावाला शासकीय नोकरी अशा मागण्या प्रशासनाने मान्य करून लेखी आश्वासन या कुटुंबीयांना आणि मराठा आंदोलकांना दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह स्वीकारला. दरम्यान अंत्यसंस्काराच्या वेळी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना इथे येण्यास मनाई करण्यात आली. तसेच संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच भागात इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली. शहरात तणावाचे वातावरण असल्यानं अनेक ठिकाणी दुकानं, बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव कायगावच्या दिशेने निघाल्याने पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.
मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनावेळी काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून थेट गोदावरी पात्रात उडी घेतली होती. पात्रात जीवरक्षक नसल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत त्याचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेचे संतप्त पडसाद ठिकठिकाणी उमटले. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी नगर रोडवर ‘रास्ता रोको’ सुरू केल्याने दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत आंदोलकांनी मृतदेह गंगापूरच्या पोलीस ठाण्यात आणला होता. शिवसैनिक असलेला काकासाहेब शिंदे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सुरुवातीपासून आघाडीवर होते.
























































