मराठा आरक्षणासाठी सिंधुदुर्गात रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगड

एक मराठा….लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे….. नाही कोणाच्या बापाचे….. जय भवानी…..जय शिवाजी….. अशा गगनभेदी घोषणा देत मराठा समाज आपल्या मागणीसाठी गुरूवार सकाळपासून आक्रमक झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यरात्रीपासून आंदोलन पेटले असून मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. देवगड, शिरगाव, पाळेकरवाडी, नाडण आदी भागात टायर जाळून आणि झाडे तोडून रस्ते रोखण्यात आले आहे. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून तालुक्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

देवगड निपाणी महामार्गावरील वाहतूक आंदोलकांनी थांबवली असून तालुक्यातील बाजारपेठा बंद आहेत. रिक्षा संघटनेने रिक्षा बंद करून आंदोलनात सहभाग घेतला आहे. सकाळी ग्रामीण परिसरातून येणाऱ्या अनेक वस्तीच्या गाड्या अडकल्याने चालक-वाहकांचे मोठे हाल झाले असून पोलीसांनी गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. मात्र तालुक्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पडले.

देवगड आगारातून मार्गस्थ होणाऱ्या सर्व प्रवासी फेऱ्या स्थानकातच थांबवाव्या लागल्या प्रसंगी वस्तीच्या शालेय महाविद्यालयीन फेऱ्या सकाळी ७ वा.पासून देवगड येथे येतात त्याही सर्व फेऱ्या कॉलेज नाका येथे अडविण्यात आल्या. त्यामुळे एसटीच्या लांबच-लांब रांगा सकाळी ११ वा.पर्यंत देवगड-जामसंडे मार्गापर्यंत लागलेल्या दिसल्या. या प्रवासी फेऱ्यांमधून आलेल्या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होवून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली.

दरम्यान, देवगड – निपाणी मार्गावरील शिरगाव पावणाई मंदिर, राकसघाटी या मार्गावर ठिक-ठिकाणी झाडे रस्त्यात आडवी केल्याने तसेच या भागात आंदोलकांनी रास्तारोको केल्याने वाटेतील प्रवासी तसेच खासगी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. अशाच प्रकारचे आंदोलन पडेल कॅन्टिंग, पाळेकरवाडी तिठा या मार्गावर उत्स्फुर्तपणे कोणताही अनुचित प्रकार न घडता देवगड तालुक्यातील आंदोलन शांततेत सुरू होते. देवगड कॉलेज नाका येथिल आंदोलन सकाळी ११ वाजता संपविण्यात येवून रस्ता रहदारीस मोकळा करण्यात आला परंतु देवगड आगारातून सुटणाऱ्या प्रवासी फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने दुपार नंतर प्रवासी फेऱ्या सोडण्याबाबतचे नियोजन आगारस्तरावर सुरू होते. आगारव्यवस्थापक डि.एम.चव्हाण, स्थानकप्रमुख सिद्धार्थ तांबे, वाहतुक निरिक्षक गंगाराम गोरे, तालुक्यातील प्रवासी फेऱ्या तसेच लांब पल्याच्या फेऱ्यांबाबत वारंवार माहिती घेत होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड मधील सर्व शाळा महाविद्यालये तात्काळ सोडून देण्यात आली तसेच तालुक्यातील ठिकठिकाणी व्यापारी बंधुंनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला व आपले व्यवसाय बंद ठेवले. त्याचबरोबर देवगड-जामसंडे परिसरातील रिक्षाव्यवसायिक तसेच अन्य भागातील रिक्षाव्यवसायिकांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.या आंदोलनामुळे प्रामुख्याने शासकिय ग्रामीण रूग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता जाणाऱ्या रूग्णांची मात्र गैरसोय झाली असली तरी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे व रूग्णालये ही सज्ज ठेवण्यात आली.

प्रामुख्याने सकल मराठा बांधव सिंधुदूर्गचे प्रमुख पदाधिकारी निशिकांत साटम, नगरसेवक उमेश कणेरकर, प्रणाली माने, मिलिंद माने, विनोद नलावडे, अमित गोळवणकर, तुषार पाळेकर, प्रकाश गायकवाड, बंटी कदम, केदार सावंत, प्रदीप सावंत, शामराव पाटील, सतीश सकपाळ, गणपत गावकर, प्रवीण वातकर, किसन सुर्यवंशी, सदानंद सावंत, चंदन जामदार, मर्गज या प्रमुख कार्यकर्त्यांनी देवगड येथील कॉलेजनाका येथे रास्तारोको केले तर शिरगाव येथे संदीप साटम यांच्या नेतृत्वाखाली तसेच पडेल, पाळेकरवाडी या भागात रवी पाळेकर, उत्तम बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक सुधीर शिंदे यांनी सकाळपासूनच आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्याची वारंवार विनंती केली. आंदोलनकर्ते पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन दुपारी १२ पर्यंत सुरूच ठेवणार या भूमिकेवर ठाम होते. अखेर या आंदोलनाची सांगता सकाळी ११ वा. झाली. कोणताही अनुचित प्रकार न होता पुरेशा पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन पार पडले.