
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
गेल्या २० ते २५ दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहेत. आरक्षणासाठी सर्वत्र मराठी समाजात संतापाची लाट उसळली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा तरुण, तरुणींना आत्महत्या केल्या आहे. राज्यात आत्महत्यांचे सत्रही वाढत असताना सरकार मात्र गंभीर असल्याचा केवळ आव आणत आहे .कोणत्याही समाजाचा विरोध नसतानाही मराठा आरक्षणास होत असलेला विलंब आणि सरकारच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापुरतील दसरा चौक येथे निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे खाली डोकं वर पाय करुन गटरीतील घाण पाण्याने अंघोळ घालण्यात आली. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करून त्यांना सुचक इशारा देण्यात आला.
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गेल्या दोन आठवड्यांपासून सकल मराठा समाजाच्या वतीनेबेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना,मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले. अशा तणावातच कोल्हापूरात शांततेत आंदोलन सुरू असतानाच रविवारी विनायक गुदगी या तरुणाने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले. त्याचे पडसाद सोमवारी दुसऱ्या दिवशीही उमटले. दसरा चौक येथे ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विविध संस्था,संघटना,तरुण मंडळे तसेच ग्रामस्थांकडून सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. याचवेळी सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शहरातील बारा मोठ्या नाल्यातील घाण पाण्याने आंघोळ घातली.


























































