मराठा समाजाचे नांदेडमध्ये 20 ऑगस्ट रोजी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाच्या न्यायासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी समाजाला संयम पाळावा लागेल. यापुढील मूक आंदोलन हे नांदेडमध्ये 20 ऑगस्ट रोजी करण्यात येईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले. हे आंदोलन करताना कायदा कोणी हाती घ्यायचा नाही. कोविडचे नियम पाळूनच आपल्याला आंदोलन करायचे आहे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत संभाजीराजे बोलत होते. या राज्यस्तरीय बैठकीत मराठा आरक्षणाबरोबरच मराठा समाजासाठी सुरू असलेल्या योजना, प्रलंबित प्रश्न आणि पुढील दिशा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

संभाजीराजे म्हणाले, केंद्राच्या घटना दुरूस्तीच्या निर्णयाने राज्याचे अधिकार अबाधित राहिले आहेत. परंतु या निर्णयाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले असे होत नाही. मराठा समाजाचे आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज फॉरवर्ड, डोमीनेट वर्ग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला राज्य मागासवर्ग आयोगाकडून पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे लागणार आहे. तसेच आपल्याला 50 टक्क्याच्या आत पिंवा 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण मिळवायचे असेल, तर सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय मराठा समाजाला कसलेही आरक्षण मिळू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारला गायकवाड समितीतील त्रुटी आणि भोसले समितीने दिलेल्या बारा मुद्दय़ांवर सखोल अभ्यास करून मागासवर्ग आयोगाकडून पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे लागेल.  

19 ऑगस्टला मेळावा

मराठा क्रांती मोर्चाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 19 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. तर 20 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार आहे.

समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण

आपल्या न्याय हक्कासाठी मराठा समाजाने आतापर्यंत 58 मोर्चे काढून आपली ताकद दाखवून दिली आहे. आता समाजाची इच्छा असेल तर मी एकटा आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करतो. त्यासाठी माझी तयारी आहे. समाजाने फक्त तारीख सांगावी. ते सांगतील तेवढे दिवस मी उपोषण करीन असेही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.