
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. प्रमोद जयसिंग होरे-पाटील असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे वृत्त कळताच मराठा आंदोलक मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरले. जालना रोडवर उत्स्फूर्त ‘रास्ता रोको’ सुरू झाल्याने वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली. दरम्यान, जिल्हाधिकाऱयांनी १० लाख रुपये मदत तसेच पात्रतेनुसार कुटुंबातील एकास नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी प्रमोद होरे-पाटील यांनी आत्महत्या केल्याचे कळताच शहरातील वातावरण प्रक्षुब्ध झाले. मराठा आंदोलकांनी मुकुंदवाडीत उत्स्फूर्त रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी जालना रोडवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली. जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संभाजीनगरसह राज्यभर शांततेच्या मार्गाने ५८ लक्षवेधी मोर्चे काढण्यात आले तरीही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. राज्य सरकारच्या या बेपर्वाईच्या भूमिकेमुळे राज्यभर आगडोंब उसळला आहे. अशा परिस्थितीत सरकारने आता चर्चेत वेळ न घालवता उद्या संध्याकाळपर्यंत कृती करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या वतीने करण्यात आली आहे.





























































