‘ती’ भेट अनमोल होती

एका अनोख्या अनुभवाची आठवण जागवत आहेत ज्येष्ठ नाटय़निर्माती व अभिनेत्री भाग्यश्री देसाई

 डॉ. आनंद नाडकर्णी लिखित आणि रसिकमोहिनी निर्मित ‘जन्मरहस्य’ या आमच्या नाटकाचा प्रयोग एकदा बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होता. डॉ. नाडकर्णी यांनी ‘स्क्रिझोफेनिआ’ या विषयावर हे नाटक लिहिलेले आहे. एका घरातली कर्ती स्त्राr या आजाराने ग्रस्त आहे आणि तिच्या आजूबाजूच्या व घरातल्या लोकांवर त्याचा काय परिणाम होतो, हे त्यांनी या नाटकात मांडले आहे. आमचा हा प्रयोग नेहमीप्रमाणेच रंगला. रसिकसुद्धा नाटक पाहून भारावले होते. प्रयोग संपल्यानंतर आमची आवराआवर सुरू झाली. कारण दुसऱया दिवशी पुण्याला दुपारी प्रयोग होता. त्यामुळे आम्हाला निघण्याची घाई होती.

आमची अशी सगळी आवराआवर सुरू असताना या नाटय़गृहाच्या मेकअप रूमनजीक मोठा वऱहांडा आहे तिथे एक गृहस्थ हातात कापडी पिशवी घेऊन उभे असल्याचे माझ्या नजरेस पडले. मी आधी लक्ष दिले नाही. कारण मला वाटले की, कुणा कलाकाराला वगैरे ते भेटायला आले असतील. बऱयाच वेळाने आमचे सगळे आवरून झाले आणि आमची निघायची तयारी सुरू झाली तेव्हा माझे लक्ष सहज तिथे गेले तर ते गृहस्थ त्याच जागी उभे होते. मग मी त्यांना विचारले, ‘‘सर, तुम्हाला कुणाला भेटायचे वगैरे आहे का?’’ यावर ते म्हणाले, ‘‘नाटकाचे निर्माते कोण आहेत? मला त्यांना भेटायचे आहे.’’  मी त्यांना म्हणाले, ‘‘मीच नाटकाची निर्माती आहे.’’ हे ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही खूप सुंदर नाटक आम्हाला दिले आहे. अशा प्रकारचा विषय सहसा कुणी हाताळत नाही, पण तुम्ही धाडसाने ते केले आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन!’’  मला कळेना की, केवळ हे सांगण्यासाठी ते इतका वेळ थांबले होते की काय, पण पुढे ते म्हणाले, ‘‘आमच्या घरी अगदी अशीच स्थिती आहे. माझ्या पत्नीला स्क्रिझोफेनिआ आहे आणि अशा लोकांना कसे सांभाळायचे ते मला तुमच्या या नाटकातून समजले. आता मी माझ्या पत्नीला अधिक व्यवस्थित समजून घेईन आणि तिची नीट काळजी घेईन.’’ वास्तविक प्रेक्षकांची अशी पावती मिळाल्यावर आम्हाला समाधान वाटते, परंतु त्यांचे एकंदरीत म्हणणे ऐकल्यावर मला वाईटही वाटले. मी त्यांचा निरोप घेत होते, तर ते म्हणाले, ‘‘जरा थांबा. एका चांगल्या नाटकाची निर्मिती केल्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी भेट द्यावीशी वाटते.’’ मी म्हणाले, ‘‘भेटीची काहीच आवश्यकता नाही. प्रेक्षकांना मिळणारा आनंद हीच आम्हाला आमच्यासाठी भेट वाटते. तुम्ही आमचे कौतुक केले हीच आमच्यासाठी मोठी भेट आहे.’’ ते गृहस्थ जरा विचारात पडले, पण पुढच्याच क्षणी त्यांच्या हातात असलेली कापडी पिशवी त्यांनी माझ्या हातात ठेवली आणि ते लगेच तिथून निघून गेले.

काय झाले हे एक क्षण मला समजलेच नाही. त्यांच्या त्या पाठमोऱया आकृतीकडे मी बघतच राहिले. काही वेळाने मी भानावर आल्यानंतर ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात वांगी, दुधीभोपळा, गाजर, काकडी अशा भाज्या होत्या. ते पाहून मी अवाकच झाले. या गृहस्थाने मला भेट म्हणून काय दिले आहे, असा विचार माझ्या मनात आला. कदाचित ती त्यांच्या रात्रीच्या जेवणाची किंवा दुसऱया दिवशीच्या स्वयंपाकाची सोय असू शकेल असा अंदाज मी केला, पण ‘त्याक्षणी’ त्यांच्या हातात मला भेट देण्यासाठी दुसरे काही नसल्यामुळे त्यांनी हातातली ती पिशवीच मला भेट म्हणून दिली असावी. मौल्यवान वस्तूपेक्षा त्या क्षणी मिळालेली एका रसिकाची ‘ती भेट’ माझ्यासाठी मात्र अनमोल होती.

त्या गृहस्थांनी त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केल्या, ते पाहून मीसुद्धा भारावून गेले. एका नाटकाचा या रसिकावर, की जो अगदी प्रत्यक्ष तशाच एका परिस्थितीतून जात आहे किती परिणाम होऊ शकतो हे त्या वेळी माझ्या लक्षात आले. एकीकडे मला आनंद झाला की, त्यांना आमचे नाटक आवडले, पण त्याच वेळी दुसरीकडे त्यांच्या पत्नीविषयी त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून वाईटही वाटत राहिले. पण काही गोष्टींना इलाज नसतो हेच खरे!  काही असो, मला मात्र माझ्या कामाची पोचपावती मिळाली होती.

शब्दांकन ः राज चिंचणकर