
आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करत पुढे जायचं. भूमिका जगण्याची उमेद आणि बळ देऊन गेली. ती शब्बो… सांगतेय अभिनेत्री/निर्माती मनवा नाईक.
नकळत्या वयापासूनच माझे रंगभूमीवर प्रेम जडलं होतं. आई, बाबा, काका सारेच रंगभूमीशी निगडित असल्याने रंगभूमीविषयी वाटणारी ओढ मला वारसा म्हणून मिळाली. शाळेत असल्यापासून मला अनेक नाटकांच्या तालमी अगदी जवळून पाहायला मिळाल्या. नाटक म्हणजे एक असा कलाविष्कार आहे की, ज्याची पोचपावती तुम्हाला ताबडतोब तिथल्या तिथेच प्रेक्षकांकडून मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे मालिका किंवा सिनेमासारखं तिथे रिटेकची सोय नसते.
आतापर्यंत मी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत नाटके केली, पण ती फार पारखून घेतलेली होती. माझं पहिलं नाटक ‘हमीदाबाईची कोठी.’ सुनील बर्वे यांच्या सुबकचं एक गाजलेलं नाटक आणि त्यातली माझी प्राणप्रिय भूमिका म्हणजे शब्बो, जिने मला पुष्कळ काही दिलं, एका वेगळय़ा अर्थाने कलाकार म्हणून, माणूस म्हणून समृद्ध केले.
शब्बोच्या भूमिकेचा ग्राफ खूप वेगळा होता. तिची आई हमीदाबाई ही कोठीवाली असली तरी तिने शब्बोला शिक्षणासाठी बाहेर ठेवलं होतं. पहिल्या अंकात जेव्हा शब्बो येते तेव्हा ती शिक्षण घेऊन परतलेली एक साधी मुलगी असते. तिच्या आईचा मृत्यू होतो तेव्हा ती एकटी पडते. विविध स्वभावाच्या, वृत्तीच्या लोकांशी, वेगवेगळय़ा व्यक्तिमत्त्वांशी ती वेगवेगळय़ा पातळीवर जोडली जाते. दिवसागणित तिचा एक वेगळा प्रवास सुरू असतो आणि शेवटच्या अंकात जेव्हा सर्व सहनशक्तीच्या पलीकडे जातं तेव्हा ती एका गुंडाशी लग्न करून संसाराला सुरुवात करते. नंतर कोठीला आग लावते.
आज या भूमिकेकडे मागे वळून पाहताना मला कळतं की, आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करत जायचं. आयुष्यातल्या वाटेवर आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही नाती रक्ताची नसतात. काही नाती आपण जुळवतो, तर काही नकळतपणे जुळतात, काही चुकतात तर काही निभावली जातात. या नाटकाच्या तालमी आणि प्रयोगादरम्यान नाटकातल्या कलाकारांनी मला बरंच काही शिकवलं. पूर्वी मीना मावशी म्हणजेच नीना कुलकर्णी या शब्बोची भूमिका करायच्या. या नाटकात त्या हमीदाबाईची भूमिका करत होत्या. त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळालं.
आयुष्याची वाट कितीही निसरडी असली किंवा खाचखळग्यांनी भरलेली असली तरी शब्बो तिचा प्रवास करत राहते.
हे रंगभूमीवरचं माझं पहिलंवहिलं पदार्पण. प्रत्येक शो हाऊसफुल. प्रेक्षागृह तुडुंब भरलेलं आणि दर प्रयोगाला मला एक नवी शब्बो सापडत गेली. हे नाटक, ही भूमिका इतकी यशस्वी झाली की, मला रंगभूमीवर नव्या भूमिका शोधण्याची आणि त्या भूमिका जगण्याची उमेद देऊन गेली. शब्बो… या भूमिकेचे हे एक आगळं-वेगळं यश आहे असं मला वाटतं.
शब्दांकन – निनाद पाटील



























































