गांधीवध नव्हे, गांधीजींचा खून! मराठी विश्वकोशात 36 वर्षांनंतर बदल

महात्मा गांधी यांना हजारोंच्या समक्ष गोळय़ा घालण्यात आल्या. या घटनेची महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या विश्वकोशात ‘गांधीवध’ अशी नोंद करण्यात आली होती. तब्बल 36 वर्षानंतर विश्वकोशातील ‘गांधीवध’ हा शब्द बदलून त्या जागेवर ‘गांधीजींचा खून’ असा शब्द टाकण्यात आला असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी दिली.

1989 मध्ये मराठी विश्वकोशाच्या चौदाव्या खंडाचे प्रकाशन झाले. या खंडात महात्मा गांधी यांच्याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात 30 जानेवारी 1948 रोजी गांधीवध करण्यात आला असा उल्लेख करण्यात आला. तब्बल 36 वर्षांपासून हा उल्लेख तसाच होता. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तूनवार, बबनराव नाखले, मराठा सेवा संघाचे मधुकरराव मेहकरे आदींनी 30 ऑक्टोबर 2020 रोजी विधानसभा अध्यक्षांकडे रीतसर याचिका करून विश्वकोशातून ‘गांधीवध’ हा शब्द वगळण्याची मागणी केली. राज्य सरकारच्या कारभारातही ‘गांधीवध’ हा शब्दप्रयोग करू नये तसेच खुनी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण टाळण्यात यावे, या मागण्याही याचिकेत करण्यात आल्या होत्या. या याचिकेची दखल घेऊन विश्वकोशाच्या चौदाव्या खंडातून ‘गांधीवध’ हा शब्द वगळण्यात आला असून त्याऐवजी ‘गांधीजींचा खून’ असा शब्दप्रयोग करण्यात आला असल्याचे विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी सांगितले.