
रिक्षा-टॅक्सींप्रमाणेच ओला, उबरसारख्या अॅपआधारित टॅक्सी तसेच अन्य सर्व व्यावसायिक वाहनांच्या चालकांना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्यच असेल, असा पुनरुच्चार परिवहनमंत्री सरनाईक यांनी या वेळी केला. त्यानुसार अमराठी चालकांसाठी २ ऑक्टोबर रोजी ‘गांधी जयंती’पासून पुन्हा ‘मराठी भाषा शिकवणी वर्ग’ सुरू केले जातील. हे वर्ग हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपर्यंत (२३ जानेवारीपर्यंत) ३६ जिल्ह्यांतील १८० केंद्रांवर सुरू राहतील. राज्यभर १८०० शिक्षकांच्या माध्यमातून अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्र्यांनी दिली.
























































