
‘एप्स्टाइन फाइल्सवरून अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. ती फाइल उघड झाल्यावर हिंदुस्थानच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे,’ असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट केले. त्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. त्यानंतर कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, ‘खरे तर हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. अमेरिकेतील मोठा उद्योगपती जेफ्रीr एप्स्टाइन याने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत राजकीय नेत्यांना त्यात गुंतवले आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचेही नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. दहा हजार पानांची एप्स्टाइन फाइल अमेरिकन संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाइल खुली करावी यासाठी ट्रम्प यांच्यावरही दबाव वाढत आहे. ती फाइल उघड झाली तर बरेच काही समोर येईल,’ या फाइलसंदर्भात भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही एक व्हिडीओ केला आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.




























































