कांबळी आणि मंडळींचे ६० तास जागते रहो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुलुंडच्या नाटय़ संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहातील नाटय़ परिषदेच्या कार्यालयातील राबताही वाढू लागला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी ठाण मांडून बसले आहेत. हे संमेलन यशस्वी करायचेच आणि त्यासाठी ६० तास जागेही राहायचे, असा निर्धारच कांबळी आणि मंडळींनी केला आहे. अर्थात धास्ती आहे ती पावसाची. पण ‘देवाक काळजी’ म्हणत पावसाला कडकडीत गाऱ्हाणेही घातले गेले आहे.

मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात १३ ते १५ जूनदरम्यान तब्बल ६० तासांचे नॉनस्टॉप नाटय़ संमेलन पार पडणार आहे. संमेलनाची मळलेली पायवाट सोडून प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱयांनी ‘पाणंदी’तून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. कांबळी निर्धास्त आहेत. संमेलन वाजणार आणि गाजणार हे त्यांना पक्के ठाऊक आहे. भीती आहे ती फक्त पावसाची. सर्व कार्यक्रम जरी बंदिस्त सभागृहात होणार असले तरी पावसाने पिंगा घातला तर त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या उपस्थितीवर होऊ शकतो.

शनिवारी पहिल्या पावसाने आपला इंगा दाखवलाच आहे. संमेलन स्थळाच्या सजावटीवर पावसाचा नाही म्हटले तरी परिणाम झालाच आहे. विशेषत: कालिदास नाटय़गृहाच्या क्रीडा संकुलाची सजावट करताना मुलुंड शाखेच्या आयोजकांना विचार करावा लागत आहे. सजावटीचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे  बाहेरील सजावट आटोक्यात ठेवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती नाटय़ परिषदेच्या मुलुंड शाखेचे दिगंबर प्रभू यांनी दिली.

राज्यभरातून १०० प्रतिनिधींची नोंदणी

नाटय़ संमेलनात तीन दिवस उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातून सुमारे १०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. २५०० रुपयांत तीन दिवस नाश्ता-जेवण आणि निवासाची व्यवस्था देण्यात आली आहे. नाटय़ परिषदेच्या राज्यांतील शाखांमध्ये ही नोंदणी झालेली आहे. मुंबई आणि ठाण्यातून नाटय़रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.  काही का असेना, पण नाटय़ संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्यापासून कांबळींनी राखणीचो कोंबडो दिल्याची चर्चाही यानिमित्ताने नाटय़ वर्तुळात रंगली आहे.

…तर नाटय़दिंडीचा वेळ कमी करणार

नाटय़गृहाबाहेर जे कार्यक्रम होणार आहेत त्यात पहिल्या दिवसाच्या नाटय़दिंडीचा समावेश आहे. नाटय़दिंडीत ४००पेक्षा अधिक लोककलावंत सहभागी होणार आहेत. हे कलावंत तब्बल १६ लोककला प्रकार सादर करतील. मुलुंड रेल्वे स्थानकापासून दिंडीला सुरुवात होईल आणि ‘कालिदास’ला प्रदक्षिणा घालून तिची सांगता होणार आहे. तब्बल दोन तास नाटय़दिंडीचा प्रवास असेल. मात्र पाऊस झालाच तर नाटय़दिंडीचा वेळ कमी केला जाईल, असे दिग्दर्शक सुभाष नकाशे यांनी सांगितले.