कार्यकारिणीत आणखी पदाधिकारी निवडले जातील! मंचाचे प्रमुख कार्यवाह यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठी भाषा वाचवण्यासाठी 24 संस्थांनी एकत्र येऊन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या ‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाला विविध क्षेत्रातील मराठी कार्यकर्त्यांची गरज आहे. गरज पडल्यास या व्यासपीठाच्या कार्यकारिणीत अजूनही पदाधिकारी निवडले जातील, अशी माहिती या मंचातर्फे देण्यात आली.

‘मराठीच्या भल्यासाठी’ या चळवळीच्या वाटचालीबद्दल माहिती देताना या व्यासपीठाचे प्रमुख कार्यवाह चंद्रशेखर गोखले यांनी सांगितले की, 5 जून 2019 रोजी महाराष्ट्रातील 24 मान्यवर संस्थांच्या प्रतिनिधींनी या चळवळीचे नेतृत्व एकमुखाने मधु मंगेश कर्णिक यांच्याकडे दिले. याच दिवशी ज्या प्रतिनिधींची कार्यकारिणीवर निवड झाली ते महाराष्ट्रातील संस्थांचे प्रमुख, अध्यक्ष होते. ते सगळे पहिल्या दिवसापासून व्यासपीठ निर्मिती प्रक्रियेत कार्यशील होते. कोमसापच्या विश्वस्त रेखा नार्वेकर यांची कोषाध्यक्षा म्हणून आणि माझी प्रमुख कार्यवाह म्हणून निवड झाली. मात्र आंदोलनासारखे कार्य 8 प्रतिनिधींनी करणे शक्य नसल्याने तसेच सरकारी पाठपुरावा करण्यासाठी मुंबईतील पूर्णवेळ कार्यकर्ते घेणे आवश्यक होते. म्हणून कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर आणि उपाध्यक्ष अशोक ठाकूर यांना सहकार्याध्यक्ष  म्हणून नंतरच्या बैठकीत समाविष्ट करून घेतले. या नेमणुकींना कुणाचाही विरोध नव्हता.

‘मराठीच्या भल्यासाठी’ सर्व पदाधिकारी अत्यंत आत्मियतेने कुठलीही वैयक्तिक लालसा न बाळगता मराठी भाषेच्या उन्नतीचे आणि संवर्धनाचे काम करीत आहेत आणि करीत राहतील, असेही गोखले यांनी स्पष्ट केले.