
अनधिकृत गाळ्यात थाटलेला अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर वसई-विरार महापालिकेचा अतिक्रमण विभाग खडबडून जागा झाला आहे. शहरातील बेकायदा बांधकामांवर ‘मॅरेथॉन बुलडोझर’ फिरवला असून पोलीस बंदोबस्तात चार दिवसांमध्ये 67 हजार चौरस फुटांचे बांधकाम पाडले आहे. या कारवाईमुळे बिल्डर लॉबी व माफियांचेही धाबे दणाणले आहेत.
वसई, विरार शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. विशेषतः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाल गतच्या भागात अनधिकृत बांधकामांचे तर पेव फुटले आहे. यात उद्योग, कारखानेदेखील आहेत. गाळे, पत्र्यांचे शेड तयार करून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत. अशाच एका गाळ्यात अवैध
व्यवसाय चालवले जात असल्याचे मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आले. त्यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
तुळींज पोलीस ठाणे ते यशवंत हाईट्सदरम्यान फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मोरेगाव नीलकंठ अपार्टमेंट येथे 3 हजार 600 चौरस फूट, रशीद कंपाऊंड, गोकुळवाडा, वनोठा पाडा येथील 17 हजार 400 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. नालासोपारा अलकापुरी येथील महेश्वरी अपार्टमेंट, रेल्वे स्टेशन जवळ 10 हजार 260 चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तर सोपारा फाटा रिचर्ड कंपाऊंड व अवधूत आश्रमसमोर 4 हजार 900 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडले आहे.
पाडकामाचा लेखाजोखा
पाटीलपाडा महामार्गालगतचे चिंचोटी ते मालजीपाडापर्यंत केलेले 20 हजार 600 चौरस फूट बांधकाम, रमेदी चर्चजवळील 1 हजार 50 फुटांचे, विरार फाटा येथील टोकरे, खैरपाडा येथे 9 हजार 900 चौरस फूट असे एकूण 67 हजार 700 चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. येत्या काही दिवसांत आणखी बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे माफिया, बिल्डर व दलाल हादरले आहेत.































































