मराठवाडय़ात महायुतीचा बोलबाला

विधानसभा निवडणुकीत मराठवाडय़ात शिवसेना-भाजप महायुतीचाच बोलबाला राहिला. हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या या भागात महायुतीचे 25 शिलेदार दणदणीत मतांनी विजयी झाले. महायुतीचा भगवा डौलाने फडकताच सर्वत्र दिवाळीआधीच फटाक्यांची आतषबाजी झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या गेल्या वेळेसच्या जागा राखण्यात यश मिळवले.

मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या संभाजीनगरचा बालेकिल्ला भगव्या रंगात न्हाऊन निघाला. संभाजीनगर पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी अपक्ष राजू शिंदे यांना 25 हजारांपेक्षा जास्त मतांनी अस्मान दाखवले. संभाजीनगर मध्यमध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी एमआयएमचे नासेर सिद्दिकी यांचा 16 हजार मतांनी पराभव केला. संभाजीनगर पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे यांनी एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांना 14 हजार मतांनी पराभूत केले. नांदेड जिल्हय़ात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ठाण मांडून होते. भोकरमध्ये त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. हदगावमध्ये काँग्रेसचे माधव जवळगावकर तर नांदेड दक्षिणमध्ये मोहन हंबर्डे विजयी झाले. नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा पराभव केला. लोहा मतदारसंघातून अपक्ष श्यामसुंदर शिंदे निवडून आले. नायगावमध्ये भाजपचे राजेश पवार, किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम तर देगलुरमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले.

अमित देशमुख, संभाजी निलंगेकर यांचे विजय
लातूर शहरमधून काँग्रेसचे अमित देशमुख, ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख विजयी झाले. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे विजयी झाले. औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार हे विजयी झाले. निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे दणदणीत मतांनी विजयी झाले. धाराशिव शहरातून शिवसेनेचे कैलास पाटील तर उमरग्यातून ज्ञानराज चौगुले यांनी नेत्रदीपक विजय मिळवला. परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांनी विरोधकांना चारीमुंडय़ा चित करून दणदणीत विजय मिळवला. तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला.

हर्षवर्धन जाधव यांचा मतदारांकडून कडेलोट
शिवसेना नेत्यांवर गलिच्छ भाषेत टीका करणाऱया हर्षवर्धन जाधवचा मतदारांनी कडेलोट केला. येथे शिवसेनेचे उदयसिंह राजपूत दणदणीत मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे येथे दुसऱया क्रमांकावर राहिले. सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊनही एकहाती लढाई करून विजय मिळवला. वैजापूर येथे शिवसेनेचे प्रा. रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगावकर यांचा पराभव केला. पैठण मतदारसंघावर शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी पाचव्यांदा भगवा डौलाने फडकवला.

आपली प्रतिक्रिया द्या