मराठवाडय़ात तीन दिवस पुरतील एवढय़ाच लसी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडय़ात सध्या तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा आहे. त्यानंतर लसीअभावी अनेक केंद्रे बंद करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. मागणी करूनही पुरवठय़ात केंद्राकडून हात आखडता घेण्यात येत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मराठवाडय़ाची एकुण लसीची मागणी 28 लाख 29 हजार 280 एवढी आहे मात्र मिळाल्यात फक्त 12 लाख 15 हजार 120 लसी. केंद्र सरकारच्या या दुजाभावामुळे मराठवाडय़ात संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मराठवाडय़ात सुरूवातीला आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धय़ांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 60 वर्षांवरील वृद्धांचे आणि आता 45 वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण करण्यात येत आहे. मराठवाडय़ाच्या आठ जिल्हय़ात मिळून 6 एप्रिलपर्यंत 12 लाख 15 हजार 120 लसीकरण झाले. त्यात सर्वाधिक 2 लाख 78 हजार 140 जणांचे लसीकरण संभाजीनगरात झाले. त्याखालोखाल नांदेड जिल्हय़ात 2 लाख 70 हजार 530 जणांना लस देण्यात आली.

संभाजीनगर जिल्हय़ात सध्या 51 हजार 828 लसी शिल्लक असून मागणी 9 लाख 50 हजार लसीची आहे. हिंगोली जिल्हय़ात केवळ 10 हजार 578 लसी हाताशी आहेत. या जिल्हय़ाने 1 लाख 05 हजार 600 लसींची मागणी केलेली आहे. जालना जिल्हय़ात 20 हजार 137 लस शिल्लक असून मागणी 5 लाखांच्या वर आहे. परभणीत 11 हजार 975 लसी शिल्लक आहेत तर 5 लाख 20 हजार लसींची मागणी आहे. बीडमध्ये 23 हजार 373 लसी शिल्लक आहेत तर मागणी एक लाखांची आहे. लातूरात 53 हजार 311 लसींचा सध्या साठा असून 70 हजार लसींची मागणी आहे.