मराठवाड्यातील धरणांत 68 टक्के पाणी; रब्बी, उन्हाळी पिकांसाठी नियोजन, शेतकऱ्यांना दिलासा

504

परतीच्या आणि अवकाळी पावसाने यंदा मराठवाडा विभागाला तारले आहे. या विभागातील धरणांत आजमितीला 68.87 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा विभागातील रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सिंचन विभागाच्या या नियोजनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मराठवाडा विभागात पैठणच्या जायकवाडी धरणासह एकूण 11 मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही 5 हजार 143 दलघमी असून, आजमितीला या प्रकल्पांत 4 हजार 106 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याची टक्केवारी 79.84 इतकी आहे. विभागात मध्यम आणि लघु प्रकल्पांची संख्याही मोठी आहे. 75 मोठ्या प्रकल्पांत 51.88 टक्के म्हणजे 478.938 दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यात 749 लघु प्रकल्पांची संख्या असून, या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही 1 हजार 712.877 दलघमी असून प्रत्यक्षात या प्रकल्पांत 750.438 दलघमी पाणी उपलब्ध आहे. या प्रकल्पांतील उपलब्ध पाण्याची टक्केवारी 43.81 आहे.

मराठवाडा विभागातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांशिवाय येथील मोठ्या नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. यामध्ये गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवर एकूण 38 बंधारे बांधून शेती-शिवारासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. या पाण्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासही मदत होत आहे. गोदावरी नदीवरील 13 बंधाऱ्यांत 269.402 दलघमी म्हणजे 82.95 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, अन्य नद्यांवरील 25 बंधाऱ्यांत 30.930 दलघमी पाणी उपलब्ध आहे.

या बंधाऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याची टक्केवारी 40.87 असून, विभागात सर्व प्रकल्पांत 5 हजार 644.71 दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी 68.87 आहे. उपलब्ध पाण्याचे सिंचन विभागाने नियोजन करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये रब्बी पिकांबरोबरच उन्हाळी हंगामातील पिकांनाही पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रब्बीच्या पिकांसाठी एक पाळी देण्यात आली असून, अन्य एक पाळी दिली जाणार असल्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील पाणीसाठा
प्रकल्प              प्रकल्प संख्या       उपयुक्त साठा दलघमी       टक्केवारी

मोठे प्रकल्प             11                   4106.00              79.84
मध्यम प्रकल्प           75                   487.938              51.88
लघु प्रकल्प             749                  750.438              43.81
गोदावरी- बंधारे         13                   269.402              82.95
तेरणा-मांजर-रेणा
नदीवरील बंधारे         25                   30.930                40.87
एकूण                   873                 5644.71               68.87

आपली प्रतिक्रिया द्या