अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात कुरुंदवाडमध्ये महिलांचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुरुंदवाड येथील उपनगराध्यक्षाच्या प्रभागात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे समस्या मांडली. यावेळी येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी दिल्याने महिला शांत झाल्या. यावेळी नगरसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. हा प्रभाग सखल भागात असूनही पाणी पुरवठा अपुरा होतो. अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. एक हंडा भरण्यासाठी खुप वेळ लागत असून केवळ एक दोन घागर पाणी मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या भेडसावत आहे. पालिका प्रशासनाने पाणीपट्टी वसुली मोहीम हाती घेतली. पण नागरिकांना पाणी पुरवठा कसा होतो, किती होतो हे पाहणे गरजेचे आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. या दिवसात पाणी जास्त प्रमाणात लागते. मात्र अपुरा पाणीपुरठ्यामुळे येथील नागरिकांच हाल होत आहेत. याच प्रभागातील समरीन गरगरे या उपनगराध्यक्षा आहेत.त्यामुळे उपनगराध्यक्षाच्या प्रभागातील नागरिक तहानलेले असल्याची अवस्था येथे दिसून येत आहे. शहरातील मुख्याधिकाऱ्य़ांनी या भागात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

संतप्त महिलांनी मोर्चा काढून नगराध्यक्ष जयराम पाटील यांना निवेदन दिले. यावेळी कांचन भुई,अनुराधा भुई,कलावती काटकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक दिपक गायकवाड,दयानंद मालवेकर,महादेव बागलकोटे, शहर अभियंता योगेश गुरव,पाणी पुरवठा अभियंता प्रदीप बोरगे,इब्राहिम जमादार आयुब पठाण आदी उपस्थित होते.