
मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गांजा शेतीचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. निमखेडी शिवारात मोहन (उर्फ नीलेश) सिताराम बेलदार यांच्या शेतात पोलिसांनी धाड टाकून तब्बल 200 गांजाच्या झाडांची नष्ट कारकाई केली. या झाडांपासून मिळालेल्या गांजाचे वजन अंदाजे 510 किलो असून त्याची बाजारातील किंमत सुमारे 34 लाख 68 हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश पाटील व उपनिरीक्षक नयन पाटील यांनी संयुक्तरित्या ही धाड घातली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढाकरे यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे. मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई आहे. काल मानेगाव येथे तब्बल 23 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता, तर आज निमखेडी शिवारातील कारवाईत 35 लाखांचा अवैध गांजा हाती लागल्याने पोलिसांनी अवैध शेती करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही या घटनांची जोरदार चर्चा सुरू असून, दोन्ही प्रकरणांमध्ये बेलदार आडनावाचे व्यक्ती आढळल्याने ते नातेवाईक आहेत का याबाबतही नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गाव परिसरात अशा प्रकारची अवैध शेती होत असल्याची माहिती मिळताच ती तत्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून या गैरप्रकारावर प्रभावीपणे प्रतिबंध घालता येईल.




























































