
संसारात पती-पत्नीमध्ये दररोज या-ना-त्या किरकोळ कारणांवरुन वाद होत असतात. काही वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अशाच वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नीतील वादाचा थेट महाभारताशी संबंध जोडला. पती आणि पत्नीतील वैवाहिक वाद जणू काही महाभारतातील युद्धच असल्यासारखे वाटते, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. पेशाने वकील असलेल्या पतीच्या वर्तणुकीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याचवेळी दाम्पत्यातील वादाला महाभारतातील युद्धाची उपमा दिली. कायद्याचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे होऊ लागला आहे, असेही न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 अंतर्गत आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला. तसेच पत्नीला एकरकमी 5 कोटी रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. न्यायालयाने पतीच्या वर्तनावर तीव्र टीका करत वकील म्हणून त्याने कायदेशीर ज्ञानाचा वापर करून पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध सूडाची आणि छळवणुकीची मोहीम चालवली, असे म्हटले आहे.
हा विवाह व्यवहारिकदृष्ट्या संपुष्टात आला आहे. या वादाने सर्व मर्यादा ओलांडल्या असून जणू काही महाभारतातील युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. पतीने पत्नी, तिचे नातेवाईक आणि तिच्या वकिलांविरुद्धही असंख्य तक्रारी दाखल केल्या आहेत. ज्यामुळे ही कार्यवाही अधिक गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या कायदेशीर गुंतागुंतीमुळे केवळ दोन आयुष्ये उद्ध्वस्त झाली नाहीत, तर न्यायव्यवस्थेवरही भार पडला आहे, असे न्यायालय पुढे म्हणाले.
पत्नी उच्चशिक्षित असली, तरी पतीला त्याच्या नैतिक आणि कायदेशीर जबाबदाऱ्यांपासून मुक्त करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच एक वर्षाच्या आत पत्नीला 5 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. दोन्ही मुलांचा ताबा आईकडे दिला असून वडिलांना त्यांना भेटण्याचे अधिकार असतील, असे नमूद केले.
या जोडप्याचा 2010 मध्ये विवाह झाला होता. जोडप्याला दोन मुले आहेत. मात्र 2016 पासून ते वेगळे राहत होते. पती व्यवसायाने वकील असून, त्याने पत्नी, तिचे नातेवाईक आणि तिच्या वकिलांविरुद्धही 80 हून अधिक खटले दाखल केले होते. हे सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. तसेच न्यायालयाने पतीला भविष्यात पत्नी किंवा तिच्या वकिलांविरुद्ध कोणताही नवीन खटला दाखल न करण्याचे हमीपत्र देण्यासही सांगितले आहे.

























































