साप्ताहिक ‘मार्मिक’चा 64वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘मार्मिक’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, दादर इथे दिमाखदार सोहळय़ात रंगणार आहे.
‘मार्मिक’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून वर्धापन दिनाच्या निमित्ताने सायंकाळी सहा वाजता ‘मर्डरवाले पुलकर्णी’ या नाटकाचा खास प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाची तिकिटे बुधवार दि. 6 ऑगस्टपासून शिवसेना भवन येथे उपलब्ध असतील. काही आसने राखीव आहेत.
‘नवे फटकारे’ प्रदर्शन
ताज्या दमाचे तरुण व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी गेल्या चार वर्षांत साकारलेल्या ‘मार्मिक’च्या टोकदार आणि जळजळीत मुखपृष्ठचित्रांचे ‘नवे फटकारे’ हे व्यंगचित्र प्रदर्शनही यनिमित्ताने शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात दि. 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी भरवण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन दिवस व्यंगचित्रकलेशी संबंधित अनेक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. ‘मार्मिक’ची मुखपृष्ठे साकारताना विषयांच्या निवडीपासूनची प्रक्रिया कशी असते, मुखपृष्ठाचे चित्र कसे आकार घेते या विषयावर गौरव सर्जेराव आणि ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांची मुलाखत 15 ऑगस्ट रोजी होणार असून अभिव्यक्ती या यूटय़ूब चॅनेलचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर ही मुलाखत घेणार आहेत.