वैवाहिक स्थानाची साथ नसेल तर काय घडू शकतं?

प्रातिनिधिक फोटो

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

नमस्कार वाचकहो,

पत्रिकेतील वैवाहिक स्थानाची तुम्हांला साथ नसेल तर काय घडू शकतं त्यावर आजचा लेख. २०१७च्या सप्टेंबर महिन्यात मला सुरेशने फोन केला होता. त्याच्या मित्राचा म्हणजेच संकेतचा प्रेम विवाह २६ ऑगस्टला झाला. तब्बल ४ वर्षाच्या ओळखीनंतर लग्नाचा हा निर्णय घेतला होता. लग्न-हनिमून झाल्यानंतर हे जोडपं बडोद्याला गेलं. नोकरी निमित्ताने संकेतला बडोद्याला राहत होता. लग्नानंतरचा नोकरीचा पहिलाच दिवस. सर्व मित्र संकेतवर अभिनंदनाचा वर्षाव करीत होते आणि लंच -ब्रेकला संकेतला मीराचा (संकेतची बायको )फोन आला. ” मला तुझ्याबरोबर राहणं असह्य होत आहे. मला हे नातं मान्य नाही. मी आताच घर सोडून जात आहे.” एवढं बोलून मीराने फोन ठेवून दिला. आपण आता जे ऐकलं ते नक्की खरं की नुसताच भास ह्या संभ्रमात संकेत तडक घरी निघून आला. खरोखरीच मीरा घरी नव्हती. त्याने मीराला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु फोन बंद येत होता. तिच्या घरी फोन करावा तर सर्वांनाच नाहक त्रास होईल ह्या विचाराने संकेतने स्वतःच शोध सुरू केला.

सर्वात आधी त्याने सोसायटीच्या सी.सी. टी. व्ही. कॅमेऱ्यातून काही सुगावा लागतो का? ह्यासाठी सेक्युरिटीची मदत घेतली. सेक्युरिटीच्या कॅमेऱ्यातून मीरा २-३ बॅग्स घेऊन एका गाडीतून रवाना होताना दिसत होती. तिच्याबरोबर तिच्याच वयाची दोन मुले दिसत होती. त्यांचा चेहरा व्यवस्थित ओळखू येत नव्हता. संकेतने स्वतःच्या आणि मीराच्या घरी फोन करून ह्या गोष्टीची कल्पना दिली. रीतसर पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. नोंद झाली. संकेत शॉकमधून बाहेर आलाही नव्हता तोपर्यंत मीराच्या आई-वडिलांनी संकेतवरच आरोप करायला सुरवात केली. आधीच सवेंदनशील असलेल्या संकेतला हे सर्व सहनच होत नव्हतं. त्याला स्वतःलाच कळत नव्हते की मीराला नक्की काय त्रास झाला? तिच्या मनात नक्की काय होत? तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तिने एवढ्या दिवसात संकेतला सांगितले का नाही? तिच्या बरोबर जी दोन मुले होती ती कोण होती? त्यांच्या बद्दल मीराने आधी कधी काहीच कसे सांगितले नाही? सर्वजण संकेतकडेच संशयाच्या दृष्टीने पहात होते. हळूहळू संकेत डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. सुरेशला त्याची ही अवस्था पाहावली नाही. म्हणूनच त्याने आज मला फोन केला होता. सुरेशकडून संकेत आणि मीराचे जन्म तपशील घेतले.

इथे प्रश्न कुंडली आणि जन्म कुंडली ह्यांचा एकत्रित अभ्यास केला आहे. प्रश्न कुंडलीत चंद्र निघून गेलेल्या व्यक्तिबद्दल माहिती देतो. इथे चंद्र शनि आणि रविबरोबर षष्ठ स्थानात. चंद्राबरोबर असणाऱ्या ग्रहांवरून त्या व्यक्तिबरोबर कोण कोण आहे ह्याची कल्पना येते. इथे दोन ग्रह म्हणजेच ती दोन मुले जी कॅमेऱ्यात मीराबरोबर दिसत होती. कर्क लग्न होते. चंद्र धनु राशीत शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात. शुक्र स्वतः पंचम स्थान बुधाच्या युतीत आणि राहूच्या नवपंचमात. ह्या वरून मीरा स्वतःच्या मर्जीने गेली आहे हे स्पष्ट होत आहे. आता प्रश्न होता तिचा शोध लागेल का? कर्क लग्न असेल तर उत्तर होकारार्थीच असते त्यामुळे मीरा स्वतःहून परत येईल. शासक ग्रहांमध्ये गुरु सोडल्यास सर्व जलद गतीचे ग्रह होते –

L – चंद्र

S – शुक्र

R – गुरु

D – मंगळ

काही दिवसांतच ती परत येईल असे सुरेशला सांगितले. पुढे घडणाऱ्या गोष्टींची माहिती मला देण्यास सुरेशला सांगितले. संकेतच्या कुंडलीचा अभ्यास केला. वृषभ लग्नाची कुंडली चंद्र कर्केचा. संकेतच्या कुंडलीमधील वैवाहिक स्थानावर लक्ष केंद्रित केले. सप्तम स्थानात वृश्चिक राशी. सप्तमेश,व्ययेश मंगळ, षष्ठेश आणि लग्नेश शुक्राबरोबर लाभात. ह्यांमुळे प्रेम-विवाह तर होईलच परंतु वैवाहिक सौख्य लाभणार नाही. सप्तमात असलेल्या हर्षलाने वैवाहिक जीवनात असे वैचित्र्य घडवून आणले असावे. सप्तम स्थानाचा सब लॉर्ड केतू असून षष्ठ स्थानाचा कार्येश आहे. षष्ठ स्थान हे वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे स्थान आहे. केतू गुरूच्या विशाखा ह्या नक्षत्रात. गुरु अष्टम आणि लाभ स्थानाचा कार्येश. घटस्फोट तर नक्की आहे. पुन्हा एकत्र येणे दिसत नाही.

मीराच्या कुंडलीवरून अजून काही गोष्टी स्पष्ट होतील म्हणून तिची कुंडली अभ्यासाला घेतली. कन्या लग्न. सप्तम स्थानात मीन राशी. सप्तमात चंद्र आणि राहू. सप्तमेश गुरु अष्टमात. कृष्णमूर्ती पद्धतीने चंद्र आणि राहू षष्ठ स्थानात तर गुरु सप्तमात आहे. सप्तमेश गुरु केतूच्या नक्षत्रात जो केतू कस्पने व्यय स्थानात. म्हणजेच इथेही वैवाहिक सौख्य नाहीच. सप्तम स्थानाचा सबलॉर्ड गुरु असून तो चतुर्थ आणि सप्तम स्थानाचा कार्येश. म्हणजेच नकारात्मक स्थाने वाटत नसली तरी सप्तम हे मारक स्थान आहे.

परंतु सध्या ह्या बद्दल मी सुरेशला काहीच सांगितले नाही. काही दिवसांतच सुरेशचा फोन आला. मीरा माहेरी परत आली होती. तिने संकेतवर आरोप वगैरे काहीच केले नाहीत. इतके दिवस ती कुठे होती? अचानक का निघून गेली ह्यांवर तिचे काहीच उत्तर नव्हते. सतत ‘मला घटस्फोट हवा आहे’ एवढेच ती बोलत होती. समाजात नाव खराब झाल्यामुळे आधीच आई- वडील संतापलेले. त्यावर तिच्या सततच्या अशा बोलण्याने घरी सतत वाद होत होते. काही दिवसांनी मीराने आत्महत्या केली. सर्वांसाठी अजून एक धक्का होता. संकेतसाठी सर्वच प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहिली होती. मीराच्या सप्तमाचा सबलॉर्ड गुरु सप्तम आणि चतुर्थ स्थानाचा कार्येश. सप्तम हे मारक स्थान आणि चतुर्थ स्थान हे मृत्यूशी निगडीत आहे. काही व्यक्तिंच्या कुंडलीत लग्न झाल्यानंतर लगेचच मृत्यूयोग असतो. जेंव्हा ही मारक आणि बाधक स्थाने कार्येश होत असतात तेंव्हा हा मृत्युयोग घडून येतो. ग्रहांनी आपले कार्य चोखपणे केले होते.

मीराच्या आत्म्यास गती मिळो ही प्रार्थना करून हा लेख इथेच थांबवते.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

आपली प्रतिक्रिया द्या