पाकड्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी; शहीद जवानाच्या मुलाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोनीपत

सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेले बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांच्यावर सोनीपतमधील त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सरकारने पाकड्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. माझ्या वडिलांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, फक्त अभिमान करून काहीही होणार नाही, पाकिस्तानच्या कारवाया सुरुच राहतील आणि देशाचे जवान शहीद होतील आणि आम्हांला फक्त अभिमान वाटत राहील. पाकड्यांचे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे मतही शहीद जवानाच्या मुलाने व्यक्त केले आहे.

नरेंद्र सिंह यांचा मृतदेह जम्मूतील रामगड सेक्टरमध्ये आढळला होता. पाकिस्तानने गोळीबार करून त्यांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती. त्यामुळे सिंह यांच्या कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत होता. देशाला शहीदांचा अभिमान आहे. मात्र, पाकड्यांच्या कारवाया सुरुच आहेत. सरकारने आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. सैनिकांबाबत सरकारच्या धोरणाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहीदांच्या कुटुंबीयांना मदत कधी मिळणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्या वडिलांच्या उत्पन्नावरच आमच्या घराचा उदरनिर्वाह होत होता. आता मी आणि माझा भाऊ बेरोजगार आहोत. त्यामुळे सरकारने शहीदांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत शहीदाच्या मुलाने व्यक्त केले आहे.