पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी

पंजाबमध्ये शनिवारी सकाळी बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. पंजाबमधील लुधियाना येथून राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनला सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ आग लागली. एसी कोचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एक महिलाही जखमी झाली आहे.

अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसला (क्र. 12204) शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अचानक आग लागली. एसी कोच क्रमांक 19 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून याची माहिती मिळताच लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केल्याने एसी कोचमधील प्रवाशांनी हाती लागेल तेवढे सामान घेऊन ट्रेनमधून उड्या घेतल्या. यात काही प्रवासी जखमीही झाले.

दरम्यान, अंबालापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर हा आगीचा थरार पाहायला मिळाला. आगीची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. प्रवाशांनी वेळीच कोचबाहेर उड्या घेतल्याने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या आगीमुळे अन्य तीन कोचचेही नुकसान झाल्याची माहिती सरहिंदचे जीआरपी एसएचओ रतन लाल यांनी दिली.